ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 20 - विजयाची हॅट्ट्रिक नोंदविल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेला दोन वेळेचा विजेता कोलकाता नाईट रायडर्स गुण तालिकेत आघाडीवर असून आयपीएल-१० मध्ये तळाच्या स्थानावर असलेल्या गुजरात लायन्सशी उद्या त्यांची
गाठ पडणार आहे. पाचपैकी चार विजयामुळे केकेआरची विजयी भूक वाढली तर गुजरातला विजयासाठी अक्षरश: झुंजावे लागत आहे. गुजरातने पाचपैकी केवळ एक सामना जिंकला.
केकेआरच्या विजयात एका खेळाडूचा नव्हे तर सांघिक वाटा राहिला. दुसरीकडे सुरेश रैनाच्या नेतृत्वाखालील गुजरात लायन्सला फलंदाजीत आणि गोलंदाजीत अपयशाचा सामना करावा लागत आहे. फिरकीपटूंनी तर घोर निराशा केली. जखमी ख्रिस लीनच्या अनुपस्थितीत दिल्लीविरुद्ध केकेआरची सुरुवात खराब झाली. तीन षटकांत १२ धावांत तीन गडी गमावल्यानंतरही मनीष पांडे ने ४७ चेंडूत नाबाद ६९ आणि युसूफ पठाणने ३६ चेंडूत ५९ धावा ठोकून संघाला सुस्थितीत आणले होते. पांडे शानदार फॉर्ममध्ये आहे.
मागच्या सामन्यात षटकार ठोकूनच त्याने विजय मिळवून दिला. उद्याच्या सामन्यानंतर केकेआरला ईडनवरच आरसीबीविरुद्ध सामना खेळायचा आहे. संघाची कामगिरी पाहता फारसे बदल होतील असे वाटत नाही. अशावेळी बांगला देशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन याला सातत्याने राखीव बाकावर बसावे लागत आहे. आंद्रे रसेलचे स्थान घेणारा कोलिन डी ग्रॅण्डहोमे हा अपयशी ठरल्याने शाकिबला संधी मिळू शकते. केकेआरचे फिरकीचे त्रिकूट सुनील नारायण, कुलदीप यादव आणि युसूफ पठाण सामन्यात रंगत आणताच सनरायजर्स हैदराबादवर केकेआरला १७ धावांनी विजय मिळवून दिला होता. रैनापुढे आव्हान राहील ते संघात संतुलन साधण्याचे. ड्वेन स्मिथ आणि अॅरोन फिंच हे अपयशी ठरल्याने जेसन राय आणि जेम्ह फॉल्कनर यांना संधी मिळू शकते. मात्र ड्वेन ब्राव्हो जखमी असल्याने संघाच्या समस्येत भर पडली. स्टार आॅल राऊंडर रवींद्र जडेजा ‘क्लिक’व्हावा अशी संघाची अपेक्षा
असेल. आरसीबीविरुद्ध ५७ धावा मोजूनही तो बळी घेऊ शकला नव्हता. केरळचा युवा वेगवान गोलंदाज बासिल थम्पी याने भेदक मारा करीत ख्रिस गेलला बाद केले होते.