मुंबई : सलग तीन पराभवांची ‘हॅट्ट्रिक’ करणाऱ्या बलाढ्य (कागदावर) मुंबई इंडियन्स शुक्रवारी आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत यशस्वी व सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध भिडेल. घरच्या मैदानावर रंगणाऱ्या या सामन्यात मुंबईसमोर मुख्य लक्ष्य असेल ते स्पर्धेतील भोपळा फोडून गुणांचे खाते उघडण्याचे; मात्र आतापर्यंतची कामगिरी पाहता ‘धोनी ब्रिगेड’समोर मुंबईकरांची मोठी कसोटी असेल.नुकतेच कर्णधार रोहित शर्माने संघामध्ये आत्मविश्वासाची कमतरता असल्याचे सांगितले. यावरूनच संघाची स्थिती लक्षात येते. त्यात भर म्हणजे, गतसामन्यात धडाकेबाज सलामीवीर फलंदाज अॅरोन फिंचला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले होते आणि आता तर तो उर्वरित आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता कमी असल्याने यजमान आणखी अडचणीत आले आहेत. मात्र, याच सामन्यात मुंबईसाठी चांगली गोष्ट झाली ती म्हणजे, किएरॉन पोलार्डचा फॉर्म. राजस्थान विरुद्ध तुफान फटकेबाजी करताना पोलार्डने मुंबईला समाधानकार मजल मारून दिली होती. मात्र, खराब गोलंदाजीमुळे मुंबईला पराभव पत्करावा लागला होता.शिवाय, सलग दोन सामन्यांत हुकमी खेळाडू व कर्णधार रोहित शर्मा शून्यावर बाद झाल्याने त्याच्यावरदेखील वेगळेच दडपण असेल. लैंडल सिमन्सला फिंचच्या जागी खेळविण्यात येऊ शकेल. तसेच, गतसामन्यात दुखापतीमुळे खेळू न शकलेला हरभजन सिंगदेखील चेन्नई विरुद्ध पुनरागमन करण्याची शक्यता असल्याने मुंबईला थोडाफार दिलासा मिळेल. तरी अँडरसन, पोलार्ड यांच्या व्यतिरिक्त रोहित शर्मा व अंबाती रायडू यांना हिसका दाखवण्याची गरज आहे. तरच मुंबईला आव्हानात्मक धावसंख्या गाठण्यात यश येईल. या सामन्यात यष्टिरक्षक पार्थिव पटेलचे स्थान गृहीत मानले जात आहे. याआधी पार्थिव चेन्नई संघातून खेळला असल्याने त्याचा फायदा मुंबईला होऊ शकतो. (क्रीडा प्रतिनिधी)गोलंदाजीमध्ये लसिथ मलिंगाचा हरवलेला फॉर्म मुंबईसाठी चिंतेचा विषय आहे. तसेच, आॅस्टे्रलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवुडच्या अनुपस्थित मुंबईकडे केवळ न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मिचेल मैकक्लीगन याचाच पर्याय आहे. विनयकुमारच्या साथीला अष्टपैलू पोलार्ड व अँडरसन यांचा मारा निर्णायक ठरू शकतो. दुसऱ्या बाजूला सलग २विजयांसह जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला चेन्नई सुपर किंग्स विजयाची हॅट्ट्रिक नोंदविण्याचा विश्वास बाळगून आहे. कर्णधार महेंद्रसिंह धोनीसह, ब्रेंडन मॅक्यूलम, ड्वेन स्मिथ, फाफ डू प्लेसिस आणि सुरेश रैना अशी जबरदस्त फलंदाजीची फळी चेन्नईकडे आहे, तर गोलंदाजीमध्ये मोहित शर्मा, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, आशिष नेहरा यांच्यावर चेन्नईची मदार असेल. विशेष म्हणजे, गतवर्षी चेन्नईने दोनवेळा मुंबईला नमवले होते. त्यामुळे एकूणच चित्र पाहत या सामन्यात यजमानांवर निश्चितच दडपण असेल. मुंबई : रोहित शर्मा (कर्णधार), अंबाती रायडू, अभिमन्यू मिथून, आदित्य तरे, पार्थिव पटेल, केरॉन पोलार्ड, कोरे अँडरसन, लसिथ मलिंगा, हरभजन सिंग, जसप्रीत बुमराह, मर्चेट डी लांगे, पवन सुयाल, श्रेयश गोपाल, लैंडल सिमेन्स, प्रग्यान ओझा, मिचेल मॅकक्लीनागन, एडेन ब्लिजार्ड, अक्षय वखरे, नितिश राणा, सिद्धेश लाड, हार्दिक पांड्या, जगदीश सुचित, उन्मुक्त चंद आणि आर. विनयकुमार, अॅरॉन फिंच.चेन्नई : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), आशिष नेहरा, बाबा अपराजित, ब्रेम्डन मैक्यूलम, ड्वेन ब्राव्हो, ड्वेन स्मिथ, फाफ-डू-प्लेसिस, इश्वर पांड्ये, मैट हेन्री, मिथून मिन्हास, मोहित शर्मा, पवन नेगी, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, सैम्युअल बद्री, सुरेश रैना, रोनित मोरे, मायकल हसी, राहुल शर्मा, काइल एबोट, अंकुश बैस, इरफान पठाण, प्रत्युस सिंग, अँड्रयू टाये आणि एकलव्य द्विवेदी.