नवी दिल्ली : गरज भासली तर मी जबाबदारीपासून पळ काढणाऱ्यांपैकी नाही, असे मत गेल्या सहा महिन्यांपासून भारतीय क्रिकेटमध्ये सुरू असलेल्या उलथापालथीपासून दूर असलेले बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केले आहे. सर्वोच्च न्यायालयात अलीकडेच ठाकूर यांनी विनाअट माफी मागितली. त्यानंतर त्यांच्यावरील खोटी साक्ष देण्याचे प्रकरण मिटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने लोढा समितीच्या सुधारणा लागू करण्यासाठी बोर्डाच्या सदस्यांचे मन वळविण्यात अपयशी ठरल्यानंतर ठाकूर यांना पदावरून हटविले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकांच्या समितीने (सीओए) जबाबदारी सांभाळली आहे, पण गेल्या सहा महिन्यांत त्यांनाही या प्रकरणात विशेष यश मिळालेले नाही. अलीकडेच माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली यांनी ठाकूर यांनी वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करताना त्यांना क्रिकेट प्रशासनामध्ये परतण्याची विनंती केली. तुम्हाला आता समाधान वाटत आहे का, याबाबत बोलताना ठाकूर म्हणाले, ‘माझा न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास आहे.’हमीपूरचे खासदार असलेले ठाकूर या कालावधीत आपल्या राजकीय कार्यात व अन्य क्रीडा संघटनांच्या कार्यामध्ये व्यस्त होते. ठाकूर म्हणाले, ‘मी या कालावधीत खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी हिमाचल प्रदेश राज्य आॅलिम्पिकचे आयोजन केले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मी हॉकी हिमाचलसोबत जुळलेला आहे. राज्यात आॅलिम्पिक खेळांना प्रोत्साहन देण्यास मी प्राधान्य देत असतो.’ (वृत्तसंस्था)सौरवने दिलेला प्रस्ताव म्हणजे त्याचे मोठेपण आहे. मी त्यासाठी भारताच्या माजी कर्णधाराचा विशेष आभारी आहे. जर भारतीय क्रिकेटला माझी जर गरज असेल तर त्यासाठी नेहमी उपलब्ध राहील. मी जबाबदारीपासून पळ काढणारा नाही. - अनुराग ठाकूर
..तर पळ काढणार नाही : ठाकूर
By admin | Published: July 17, 2017 12:26 AM