शिवाजी गोरे, नवी दिल्लीचेन्नई सुपर किंग्ज हा भूतकाळ झाला. आता राइजिंग पुणे सुपरजायंट्स या नव्या संघासोबत जोडलो गेलो आहे. त्यामुळे आगामी आयपीएल सत्रात जुने विसरून, नव्याने जोमात सुरुवात करणार असल्याचे, पुणे संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पत्रकार परिषदेत सांगितले. राइजिंग पुणे सुपरजायंट्स संघाच्या जर्सी अनावरण कार्यक्रमात धोनी बोलत होता. या वेळी संघ मालक संजीव गोएंका उपस्थित होते. धोनी म्हणाला, ‘गेली आठ वर्षे चन्नई सुपर किंग्ज संघाबरोबर मी जोडलो होतो. आठ वर्षांचा काळ काही कमी नाही. त्या संघाबरोबर निर्माण झालेले भावनिक संबंध विसरता येणार नाहीत. आम्ही व्यावसायिक खेळाडू आहोत. त्यामुळे त्याकडे जास्त लक्ष आता देण्यात काही अर्थ नाही, पण आता मी नवीन पुणे संघाबरोबर जोडलो गेलो आहे. त्यामुळे नवीन संघ मालकांनी माझ्यावर सोपविलेली जबाबदारी आणि टाकलेला विश्वास माझ्या नवीन सर्व संघ सहकाऱ्यांबरोबर १०० टक्के सार्थ करण्याचा प्रयत्न करणार आहे.’ रैनाबाबत विचारले असता, धोनी म्हणाला, ‘रैना धोनीविरुध्द खेळणार नसून, तो त्याच्या संघासाठी खेळणार आहे. त्यामुळे तोसुद्धा विजयी होणासाठी प्रयत्न करणारच. काहीही झाले तरी हा खेळ आहे. आयपीएलमुळे युवा क्रिकेटपटूंना संधी मिळत आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंबरोबर खेळताना त्यांचा आत्मविश्वास वाढतोय. ३५ ते ४० हजार प्रेक्षकांसमोर खेळल्याने दबावास सामोरे जाण्याची क्षमता वाढते, असेही धोनीने सांगितले.संघ मार्गदर्शकांबाबत : स्टिफन फ्लेमिंग यांच्याबरोबर मी गेली आठ वर्षे आहे. त्यांच्यात सकारात्मक निर्णय घेण्याची क्षमता आहे. प्रत्येक खेळाडूबाबत लहान-सहान गोष्टींचा विचार करून त्याचा कसा उपयोग करून घेता येईल, यात त्यांचा हातखंडा आहे. आम्हा दोघांची विचारसरणी सकारात्मक असल्यामुळे, आमचे ट्युनिंग चांगले जमते.
पुणेसह नव्याने सुरुवात करणार - एम. एस. धोनी
By admin | Published: February 16, 2016 3:29 AM