ऑनलाइन लोकमत
पोर्ट ऑफ स्पेन, दि. 26 - दुस-या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर कर्णधार विराट कोहलीने अँटीग्वा येथे होणा-या तिस-या वनडेमध्ये संघात काही बदल करण्याचे संकेत दिले आहेत. आम्ही एकत्र बसू आणि संघात काय बदल करता येऊ शकतात यावर चर्चा करु. काही नव्या चेह-यांना संधी मिळू शकते असे विराटने सामन्यानंतरच्या पत्रकारपरिषदेत सांगितले.
दिल्लीच्या ऋषभ पंतच्या नावाची जोरदार चर्चा असून, त्याला तिस-या वनडेमध्ये संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. यष्टीरक्षक, फलंदाज असलेल्या ऋषभने यंदाच्या आयपीएल हंगामात दमदार फलंदाजी केली होती. सध्या युवराज सिंगचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय बनला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सलामीच्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात फटकावलेले अर्धशतक वगळता युवराजला अद्याप लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
आणखी वाचा
वेस्ट इंडिज दौ-यावर पहिल्या वनडेमध्ये युवराजने फक्त 4 धावा केल्या होत्या. दुस-या सामन्यात त्याला फक्त 14 धावाच करता आल्या. दुस-या बाजूला महेंद्रसिंह धोनी फॉर्ममध्ये असला तरी, युवराज आणि धोनीच्या वयाचा मुद्दा विचारात घेण्याची मागणी होत आहे. दोन वर्षांनी 2019 मध्ये होणारा वर्ल्डकप लक्षात घेता धोनी आणि युवराजच्या भूमिकेबद्दल निर्णय घेण्याची वेळ आली आहे असे मत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने व्यक्त केले होते. ऋषभ यष्टीरक्षक असल्यामुळे तिस-या वनडेमध्ये धोनी किंवा युवराजला विश्रांती देऊन त्याचा संघात समावेश केला जाऊ शकतो.
भारताचा दमदार विजय
दरम्यान अजिंक्य रहाणेचे दमदार शतक (103) व शिखर धवन (63), कर्णधार विराट कोहली (87) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने दुस-या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 105 धावांनी पराभव केला. यासोबतच 5 सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे, दोन्ही संघांमधील पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला होता.
या सामन्यात फलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या बळावर भारताने निर्धारीत 43 षटकात वेस्ट इंडिजविरुध्द 5 बाद 310 धावांचा डोंगर उभारला. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 43 षटकात 6 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 205 धावा बनवू शकला.