पुणे : शासनाच्या वतीने देण्यात देणारे विविध क्रीडा पुरस्कारांचे वितरण या वर्षी तरी १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीचा मुहूर्त साधून होणार का, याची चर्चा राज्याच्या क्रीडा क्षेत्रात सुरू आहे. या वर्षी २०१४-१५, १५-१६ आणि १६-१७ अशी तीन वर्षांसाठीचे पुरस्कार दिले जाणार आहे. दिव्यांग खेळाडूंचाही सन्मान केला जाणार आहे.राज्यातील विविध क्रीडा पुरस्कारांचे वितरण १९ फेब्रुवारीलाच मुंबई येथे राजभवनात केले जाईल, असे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी पुण्यात जाहीर केले होते. पण हा मुहूर्त गेल्या अनेक वर्षांपासून कधीच पाळला गेला नाही. गेल्या महिन्यात पुरस्कारासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया संपली. सध्या छाननी सुरू आहे. हे काम पूर्णत्वाला आले असून, या वर्षी शिवजयंतीचा मुहूर्त नक्की साधला जाईल, असे राज्यातील एका उपसंचालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.राज्यातून विविध पुरस्कारांसाठी एकूण ७७५ अर्ज आले आहेत. यामध्ये तीन वर्षांच्या मिळून आलेल्या अर्जांचा समावेश आहे. उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक १०९, खेळाडू ३८६, साहसी ३४, दिव्यांग ४४, क्रीडा संघटक आणि जिजामाता पुरस्कारासाठी १२६ आणि जीवनगौरवसाठी ७६ अर्ज आले आहेत. जीवनगौरव पुरस्काराची शिफारस संबंधित विभागाच्या उपसंचालकांनी करायची आहे. त्यानुसार ८ विभागांच्या उपसंचालकांनी नाव सुचवायचे असून त्याची क्रीडा क्षेत्रामधील सर्व माहिती एकत्र करून सादर करायची आहे.शासनाच्या पुरस्काराच्या नियमावलीतील आंतरराष्टÑीय स्पर्धांच्या मानांकनानुसार थेट पुरस्कारसुद्धा देण्यात येणार आहे. यामध्ये केंद्र शासनाचा अर्जुन पुरस्कार मिळाला असेल तर खेळाडूला थेट पुरस्कार दिला जाणार आहे. यामध्ये ललिता बाबर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, अभिलाषा म्हत्रे, ममता पुजारी यांच्या समावेशाची शक्यता आहे. हे सर्वच पुरस्कार महत्त्वाचे आहेत, पण जीवनगौरव हा पुरस्कार सर्वश्रेष्ठ मानला जातो. त्याबाबत उत्सुकता आहे.पुण्यातून विविध पुरस्कारांसाठी एकूण १९० अर्ज आले आहेत. यामध्ये उत्कृष्ट मार्गदर्शक ५१, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार (खेळाडू) ११२, साहसी पुरस्कारसाठी ४, एकलव्य पुरस्कारसाठी १४, क्रीडा संघटक व जिजामाता पुरस्कार दोन्ही मिळून९ आणि जीवनगौरव पुरस्कारसाठी९ अर्ज आले असल्याची माहिती मिळाली आहे.
...शिवजयंतीचा मुहूर्त पाळणार का? राज्य विविध क्रीडा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 2:21 AM