ऑनलाइन लोकमत -
विम्बल्डन : ब्रिटिश खेळाडूसमोर असणार भेदक सर्व्हिसचे आव्हान
लंडन, दि. 09 - इंग्लंडचा फुटबॉल संघ युरो चषक फुटबॉल स्पर्धेतून लज्जास्पद प्रकाराने बाहेर फेकला गेल्यानंतर या जखमेवर ब्रिटनचा नंबर वन टेनिसपटू अँडी मरे याने मलम लावताना विम्बल्डनमध्ये पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. जागतिक क्रमवारीतील द्वितीय मानांकित खेळाडू अँडी मरे याने दहाव्या मानांकित झेक प्रजासत्ताकच्या टॉमस बेर्डिच याचा ६-३, ६-३, ६-३ असा पराभव करीत अंतिम फेरीत धडक मारली. आता त्याची गाठ फायनलमध्ये भेदक व वेगवान सर्व्हिससाठी प्रसिद्ध असणा-या कॅनडाचा वादळी खेळाडू मिलोस राओनिक याच्याशी पडणार आहे.
मरे आणि राओनिक यांच्यातील हायहोल्टेज फायनल रविवारी खेळवली जाईल. मरे याने ११ व्या वेळेस ग्रँडफायनलमध्ये धडक मारली आहे आणि त्याने फ्रेड पॅरीला मागे टाकत नवीन ब्रिटिश रेकॉर्ड रचला आहे. मरे याने यावर्षीच्या आतापर्यंतच्या तिन्ही ग्रँडस्लॅम फायनलमध्ये धडक मारली आहे आणि तो ग्रास कोर्टवर सलग ११ सामने जिंकला आहे. आपला माजी प्रशिक्षक इव्हान लेंडलसोबत जोडल्या गेल्यानंतर त्याच्या खेळात जबरदस्त सुधारणा झाली आहे.
ब्रिटिश खेळाडूला यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचकडून पराभव पत्करावा लागला होता; परंतु जोकोविच याचे तिस-याच फेरीत आव्हान संपुष्टात आल्यामुळे फायनलमध्ये मरे आणि येथील सात वेळेसचा चॅम्पियन स्वीत्झर्लंडचा रॉजर फेडरर यांच्यात लढत होऊ शकते, असे अंदाज बांधले जात होते; परंतु राओनिक याने या अंदाजाला तडे देताना उपांत्य फेरीत जबरदस्त खेळ करीत फेडररला पाच सेटमध्ये नमवले. त्याबरोबर राओनिकने विम्बल्डन फायनलमध्ये पोहोचताच इतिहासही रचला. तो ग्रँडस्लॅम फायनलमध्ये पोहोचणारा कॅनडाचा पहिला खेळाडू ठरला. त्याची १४0 प्रति तास वेगाने अचूक सर्व्हिस पडल्यास तो मरे याचे दुसरे विम्बल्डन जिंकण्याचे स्वप्न उद्ध्वस्त करू शकतो.