लंडन : माझ्या नावावर असलेल्या १६ ग्रँडस्लॅम किताबांपैकी हा किताब सर्वोच्च नाही; मात्र विम्बल्डनसारख्या प्रतिष्ठित कोर्टवर मिळविलेला प्रतिष्ठेचा ग्रँडस्लॅम किताब माझ्यासाठी खास असल्याचे भारताचा स्टार टेनिसपटू लिएंडर पेसने वृत्तसंस्थेस सांगितले. पेस याने स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीस हिच्या समवेत मिश्र दुहेरीत आॅस्ट्रियाच्या अलेक्झांडर पेया व हंगेरीच्या टिमिया बाबोस या जोडीवर ६-१, ६-१ असा सहज विजय मिळवीत विम्बल्डन स्पर्धेत विजेतेपद पटकावले. पेसचा हा आठवा मिश्र दुहेरीचा किताब असून, त्याने हिंगीससमवेत दुसरा किताब जिंकला आहे. पेस म्हणाला, की माझ्या कारकिर्दीत मला मार्टिना नवरातिलोवा व मार्टिना हिंगीस यांसारख्या महान खेळाडूंसमवेत खेळण्याची मिळालेली संधी अद्भुतच म्हणावी लागेल. या दोन्ही खेळाडू केवळ कोर्टवरच नव्हे, तर आपल्या जीवनातदेखील महानच आहेत. त्यांचा मी मनापासून आदर करतो. हिंगीसने सानिया मिर्झा हिच्यासमवेत महिला दुहेरीचा किताबही नावावर केला आहे. हिंगीसचा हा १८ वा ग्रँडस्लॅम किताब असून, मिश्र दुहेरीतील हा तिसरा चषक तिने नावावर केला आहे. हिंगीस म्हणाली, की लिएंडर एक महान खेळाडू आहे. आम्ही एकत्र अभ्यास करून एकमेकांचा खेळ अधिक कसा सुधारेल यावर भर दिला. लिएंडरसमवेत मी गेल्या दोन वर्षांत अमेरिकेत एकत्र खेळले. सानियासमवेत मी मार्चपासून खेळत आहे. हा कालावधी माझ्यासाठी खूप चांगला राहिला आहे. आता तर मी काही अंशी भारतीयच झाले आहे. ग्रँडस्लॅम (मिश्र दुहेरी) आॅस्ट्रेलियन ओपन : २००३, २०१०, २०१५; विम्बल्डन : १९९९, २००३, २०१०, २०१५;यूएस ओपन : २००८ग्रँडस्लॅम दुहेरीत :आॅस्ट्रेलियन ओपन : २०१२; फ्रेंच ओपन : १९९९, २००१, २००९; विम्बल्डन : १९९९; यूएस ओपन : २००६, २००९, २०१३.
विम्बल्डन किताब माझ्यासाठी खास
By admin | Published: July 14, 2015 2:45 AM