ऑनलाइन लोकमतलंडन, दि. ६ : माजी विजेता आणि तब्बल ७ वेळचा विम्बल्डन चॅम्पियन असलेल्या स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत धडक मारली. तब्बल ५ सेटपर्यंत रंगलेल्या या अत्यंत अटीतटीच्य लढतीत क्रोएशियाचा जागतिक क्रमवारीत ९व्या स्थानी असलेल्या मरिन सिलिच याचे कडवे आव्हान फेडररने ६-७(४-७), ४-६, ६-३, ७-६(११-९), ६-३ असे झुंजाररीत्या परतावले. उपांत्या सामन्यात फेडररपुढे कॅनडाच्या मिलोस राओनिकचे तगडे आव्हान असेल.तब्बल चार वर्षांचा ग्रँडस्लॅम जेतेपदाचा दुष्काळ मिटवण्यासाठी फेडररला यंदाची विम्बल्डन एक सुवर्णसंधी आहे. अव्वल खेळाडू नोव्हाक जोकोविच आणि स्टॅन वावरिंका यांचा धक्कादायक पराभव तसेच, स्पेनचा कट्टर प्रतिस्पर्धी राफेल नदालने दुखापतीमुळे घेतलेली माघार यामुळे फेडररला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जाते. यावेळी त्याला ब्रिटनचा जागतिक क्रमवारीत दुसरा असलेल्या अँण्डी मरेकडून अडसर ठरु शकतो. मात्र उपांत्यपुर्व फेरीत सिलिचने जबरदस्त खेळ करताना दिग्गज फेडररला चांगलेच झुंजवले.सिलिचचा धडाका पाहून फेडररसह त्याच्या पाठिराख्यांवरही प्रचंड दबाव आला होता. मात्र आपल्याला चॅम्पियन खेळाडू का म्हणतात हे सिध्द करताना फेडररने अखेरपर्यंत कडवी झुंज देताना सिलिचला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. सेंटर कोर्टवर झालेल्या या सामन्यात पहिले दोन सेट गमावल्यानंतर फेडररने आपला दर्जा दाखवताना सिलिचला पिछाडीवर टाकण्यास सुरुवात केली. दोन्ही खेळाडूंनी तोडीस तोड खेळ करताना तब्बल तीन तास १७ मिनिटांपर्यंत रंगलेल्या रोमांचक लढतीत टेनिसप्रेमींना उच्च दर्जाच्या खेळाची मेजवानी दिली. आक्रमक खेळ झालेल्या या सामन्यात एकूण ५० एस शॉट मारण्यात आले. त्यापैकी फेडररने २७ अप्रतिम एस मारले. ......................................राओनिक उपांत्य फेरीत अन्य लढतीत अव्वल खेळाडू आणि संभाव्य विजेत्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला धक्का देणाऱ्या अमेरिकेच्या सॅम क्वेरीला सहाव्या मानांकीत मिलोस राओनिकने ६-४, ७-५, ५-७, ६-४ असे नमवले. या विजयासह राओनिकने दुसऱ्यांदा विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
विम्ब्लडन : सिलिचचे आव्हान मोडून फेडररची उपांत्य फेरीत धडक
By admin | Published: July 06, 2016 9:45 PM