ऑनलाइन लोकमतलंडन, दि. ५ : ब्रिटनचा स्टार खेळाडू आणि दुसरा मानांकित अॅन्डी मरेने पुरुष एकेरीत आॅस्ट्रेलियाच्या निक किर्गियोसचा तीन सेटमध्ये ७-५, ६-१, ६-४ गुणांनी पराभव करून विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व खेरीत प्रवेश केला. मरेने ९ व्यांदा या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. दुसरीकडे आॅस्ट्रेलियाच्या बर्नाड टॉमिकला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या असलेल्या मरेने चौथ्या फेरीत १५ वे मानांकन असलेल्या किर्गियोसला सरळ तीन सेटमध्ये पराभूत केले. घरच्या मैदानावर खेळत असलेल्या मरेच्या नावाला विजेतेपदाचा दावेदार म्हणून सट्टेबाजांची पसंदी जास्त आहे. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या मरेने आतापर्यंत या स्पर्धेत एकही सेट गमाविला नाही. अंतिम आठमध्ये मरेला १२ वा मानांकीत विलफ्रेड सोंगाचे आव्हान असणार आहे. २०१३ मध्ये मरेने सर्बियाच्या जोकोविचला पराभूत करून विजेतेपद जिंकले होते. १९३६ नंतर विम्बल्डन स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारा पहिला ब्रिटश खेळाडू होता. दुसरीकडे पुरुष एकेरीत ३२ वा मानांकित फ्रान्सच्या लुकास पोईलीने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून १९ व्या मानांकित बर्नाड टॉमिकला तीन तास चाललेल्या लढतीत पराभूत केले. २२ वर्षीय पोईलीने या पूर्वी ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत कोणत्याही मानांकित खेळाडूला पराभूत केले नव्हते. टॉमिकला पुढच्या फेरीत वेस्ली किंवा टॉमस बेर्दीचे आव्हान राहणार आहे. महिलांच्या गटात चौथ्या फेरीत रशियाच्या एलिनान वेस्त्रीने आपल्या देशाच्या एकातेरिना माकारोव्हाला ५-७, ६-१, ९-७ गुणांनी नमविले. माजी नंबर वन अमेरिकेच्या व्हीनस विलियम्सने १२ व्या मानांकीत स्पेनच्या कार्ला सुआरेज नवारोला ७-६, ६-४ असे पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
विम्बल्डन टेनिस : मरे उपांत्यपूर्व फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2016 5:08 PM