विंडीज
By admin | Published: December 19, 2014 11:55 PM
फिलँडरचे चार बळी, विंडीज २०१ धावांत गारद
फिलँडरचे चार बळी, विंडीज २०१ धावांत गारदसेंच्युरियन : वर्नोन फिलँडरच्या (४ बळी) अचूक माऱ्याच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा पहिला डाव २०१ धावांत गुंडाळला आणि पहिल्या कसोटी सामन्यावर पकड मजबूत केली. दक्षिण आफ्रिकेने पहिला डाव ५ बाद ५५२ धावसंख्येवर घोषित केला. पहिल्या डावात ३५१ धावांची आघाडी मिळविणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाने विंडीज संघाला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. फॉलोऑन स्वीकारीत दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या विंडीज संघाने तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात २ बाद ७६ धावा केल्या होत्या. डावाने पराभव टाळण्यासाठी विंडीजला अद्याप २७५ धावांची गरज असून त्यांच्या ८ विकेट शिल्लक आहे. आजचा खेळ थांबला त्यावेळी ३३ धावा काढून नाबाद असलेल्या लिओन जॉन्सन याला मार्लोन सॅम्युअल्स (१३) साथ देत होता. फिलँडरने पहिल्या डावात दोन्ही सलामीवीरांसह अनुभवी शिवनारायण चंद्रपॉल व जरमेन ब्लॅकवुड यांना तंबूचा मार्ग दाखविला. क्रेग ब्रेथवेट (३४) व डेव्होन स्मिथ (३५) यांनी दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांना समर्थपणे तोंड देत ७२ धावांची भागीदारी केली. फिलँडरने या दोन्ही सलामीवीरांना लागोपाठच्या षटकांमध्ये बाद केले. (वृत्तसंस्था)