भारतीय नौदलाची विजयी सुरुवात एमडीएफए फुटबॉल : आरसीएफने झुंजवले
By admin | Published: September 16, 2015 11:38 PM
मुंबई : बलाढ्य भारतीय नौदलाने एमडीएफए एलिट गटाची विजयी सुरुवात करताना राष्ट्रीय केमिकल ॲण्ड फर्टीलायझर्स (आरसीएफ) संघाला पराभवाचा धक्का दिला. मात्र यावेळी नौदलाला विजयासाठी चांगलेच झुंजावे लागले. अन्य एका सामन्यात छेडा नगर प्रॉडीजी संघाने आक्रमक खेळ करताना ब्लिट्सक्रिगचा ३-० असा धुव्वा उडवला.
मुंबई : बलाढ्य भारतीय नौदलाने एमडीएफए एलिट गटाची विजयी सुरुवात करताना राष्ट्रीय केमिकल ॲण्ड फर्टीलायझर्स (आरसीएफ) संघाला पराभवाचा धक्का दिला. मात्र यावेळी नौदलाला विजयासाठी चांगलेच झुंजावे लागले. अन्य एका सामन्यात छेडा नगर प्रॉडीजी संघाने आक्रमक खेळ करताना ब्लिट्सक्रिगचा ३-० असा धुव्वा उडवला.मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनाच्या (एमडीएफए) वतीने कुपरेज स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नौदलाने विजयी सलामी दिली खरी, मात्र यासाठी त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागले. सप्टेंबरच्या सुरुवातीलाच केरळ येथे झालेल्या जी. व्ही. राजा अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत बाजी मारलेल्या नौदलाने आपली विजयी मालिका कायम राखली. आरसीएफने सुरुवातीपासूनच भक्कम बचाव करताना नौदलाचे आक्रमण रोखताना मध्यंतराला सामना गोलशुन्य बरोबरीत राखला. यानंतर नौदलाने आक्रमक चाली रचताना आरसीएफवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांना यशही आले आणि आरसीएफला चुक करण्यास भाग पाडून ७५व्या मिनिटाला पेनल्टी कीक मिळवली. या मिळालेल्या सुवर्णसंधीचा पुरेपुर फायदा उचलताना सुनील नाईकने निर्णायक गोल करुन नौदलाच्या १-० अशा विजयावर शिक्का मारला.यानंतरच्या एकतर्फी झालेल्या सामन्यात छेडा नगर प्रॉडीजी संघाने उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना ब्लिट्झक्रेगचा एससीचा ३-० असा धुव्वा उडवला. शावेझ सुर्वे याने सर्वाधिक २ गोल नोंदवताना संघाच्या विजयामध्ये मोलाचे योगदान दिले. तर राकेश मेनन याने एक गोल करुन सुर्वेला मोलाची साथ दिली. (क्रीडा प्रतिनिधी)........................................