ऑनलाइन लोकमत
वेलिंग्टन, दि. २१ - विश्वचषकाच्या चौथ्या व शेवटच्या क्वार्टर फायनलमध्ये न्यूझीलंडने वेस्टइंडिजचा १४३ धावांनी दणदणीत पराभव केला आहे. या विजयाचा शिल्पकार ठरला विक्रमी द्विशतक झळकावणारा मार्टिन गपटील. मार्टिन गपटीलने अवघ्या १५२ चेंडूंमध्ये द्विशतक झळकावत एकदिवसीय सामन्यात द्विशतक करणारा पहिला न्यूझीलंडचा खेळाडू असा विक्रमही केला आहे. पहिली फलंदाजी करताना न्यूझीलंडने वेस्ट इंडिजसमोर ३९३ धावांचा डोंगर रचला आणि जिंकण्यासाठी ३९४ धावांचे आव्हान ठेवले. परंतु ख्रिस गेलच्या ६१ धावांची खेळी संपुष्टात आल्यावर न्यूझीलंडसाठी सामना जिंकणं हा केवळ उपचार राहिला होता. किवींनी विंडिजचा डाव २५० मध्ये ३० षटकांमध्ये गुंडाळला आणि सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला.
एकदिवसीय सामन्यात द्विशतक करण्याचा न्यूझीलंडचा पहिला खेळाडू असा मान मार्टिन गपटीलने मिळवला आहे. विश्वचषकात द्विशतक करण्याचा विक्रम करणारा ख्रिस गेलपाठोपाठ तो दुसरा फलंदाज ठरला आहे. गपटीलने १५२ चेंडूंमध्ये २०० धावा केल्या. त्यानंतरही गपटीलने वेस्टइंडिजच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवताना नाबाद २३७ धावा केल्या. गपटीलला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.
तीन गडी बाद करणा-या वेस्ट इंडिजच्या सर्वात यशस्वी ठरलेल्या जेरोम टेलरच्या सात षटकांमध्येही न्यूझीलंडने ७१ धावा केल्या हे बघता गपटील व त्याच्या सहका-यांनी केलेलं आक्रमण लक्षात येतं. ख्रिस गेलने झंझावाती खेळी करत काही काळ विंडिजच्या आशा जिवंत ठेवल्या, परंतु न्यूझीलंडच्या अचूक मा-यापुढे आणि मोठ्या धावसंख्येच्या दबावाखाली विंडीजची फलंदाजी ढेपाळली आणि अखेर १४३ धावांनी पराभूत होत विंडिजचा संघ गारद झाला.
आता २४ मार्च रोजी न्यूझीलंड पहिली सेमीफायनल दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळेल आणि त्यांच्यात जिंकणा-या संघाची अंतिम लढत भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील विजेत्याशी होईल.