इंदौर : रिओ आॅलिम्पिकमध्ये कास्यपदक जिंकणारी साक्षी मलिक हिची भारताचा स्टार मल्ल सुशीलकुमार याच्याकडून प्रेरणा घेत त्याच्याप्रमाणेच आॅलिम्पिकमध्ये सलग दोन वेळेस पदक जिंकण्याची इच्छा आहे.साक्षी येथे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सहभागी झाली आहे. ती म्हणाली, ‘‘सुशील माझ्यासाठी मोठा प्रेरणास्रोत राहिला आहे. त्याला खेळताना पाहून आपणही आॅलिम्पिक खेळू आणि देशासाठी पदक जिंकू, असा विचार करीत होते. तथापि, मी आता आॅलिम्पिकपदक विजेती आहे; परंतु मला त्याच्यासारखे बनायचे आहे आणि आॅलिम्पिकमध्ये दोन पदक जिंकण्याचा विक्रम कायम करायचा आहे.’’२00८ च्या बीजिंग आणि २0१२ च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये अनुक्रमे कास्य आणि रौप्यपदक जिंकणाºया सुशीलने तीन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर येथे राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिपद्वारे मॅटवर पुनरागमन केले आहे. या स्पर्धेत कुस्तीप्रेमींचे लक्ष हे सुशील आणि साक्षी यांच्यावरच जास्त आहे.साक्षी म्हणाली, ‘‘माझ्या मते, सर्वच वरिष्ठ खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी व्हायला हवे. या स्पर्धेद्वारे आम्ही खेळाच्या जवळ राहतो आणि आम्हाला खूप काही शिकायला मिळते. आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी आम्हाला या अनुभवाचा लाभ मिळतो. मी प्रत्येक छोट्या-छोट्या स्पर्धेत सहभागी होते. कारण मी कुस्ती खेळापासून दूर राहू इच्छित नाही.’’२0२0 मध्ये टोकियोत होणाºया आगामी आॅलिम्पिक स्पर्धेच्या तयारीविषयी विचारल्यावर ती म्हणाली, ‘‘वेळ कसा जातो हे लक्षात येत नाही. मला रिओ आॅलिम्पिक खेळून एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. पुढील आॅलिम्पिकची उलटी गणतीदेखील सुरू झाली आहे. याविषयी थोडा दबावही आहे; परंतु मी माझ्या मनात प्रत्येक दिवशी पुढील आॅलिम्पिकसाठी चांगली तयारी करायची आहे, ज्यामुळे मी आपल्या पदकाचा रंग बदलू शकेल याची मनात गाठ बांधली आहे.’’साक्षीने आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारी लक्षात घेऊन पहिलवानांसाठी उपलब्ध सुविधांविषयी समाधान व्यक्त केले. ती म्हणाली, ‘‘भारतीय कुस्ती महासंघाच्या प्रयत्नांमुळे देशातील पहिलवानांना आधीपेक्षा चांगल्या सुविधा आहेत.’’ तथापि, सुविधांबाबत देशात प्रत्येक खेळ आणि खेळाडूंना एकसारखे महत्त्व द्यायला हवे, यावरही तिने जोर दिला. ती म्हणाली, ‘‘ क्रिकेटला जास्त आणि कुस्तीला कमी महत्त्व मिळावे, अथवा बॅडमिंटनला जास्त आणि टेबल टेनिसला कमी महत्त्व दिले जावे असे घडायला नको. सर्वच खेळ आणि खेळाडूंना समान महत्त्व द्यायला हवे.’’
सुशीलपासून प्रेरणा घेऊन दोन वेळा आॅलिम्पिक पदक जिंकायचे : साक्षी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 8:23 PM