बीजिंग : कोरोनाचे उगमस्थान असलेल्या असलेल्या चीनमध्ये हिवाळी ऑलिम्पिक २०२२ ला आज शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. युरोपातील चार देशांनी स्पर्धेच्या आयोजनास नकार दिल्यानंतर, अखेर बीजिंगने समस्येवर तोडगा काढला. कझाखस्तानही स्पर्धेत होता. पण अखेर आयओसीने बीजिंगला यजमान म्हणून निवडले. स्पर्धेची सुरुवात बर्ड नेस्ट स्टेडियममध्ये उद्घाटन सोहळ्यासह होईल. यासोबतच मानवाधिकाराचे उल्लंघन करणाऱ्या चीनकडे जगाचे लक्ष असणार आहे. कोरोना पसरविण्यास चीन कारणीभूत असल्याचा अनेक देशांचा आरोप आहे. मात्र चीनने हा आरोप कधीही मान्य केलेला नाही. पुढील अडीच आठवडे ९० देशांच्या २९०० खेळाडूंची स्कीईंग, स्केटिंग आणि स्लायडिंगची रोमहर्षक कौशल्ये पाहायला मिळणार आहेत. मानवाधिकाराचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून अमेरिकेसह अनेक देशांनी हिवाळी ऑलिम्पिकचा बहिष्कार केला. सहभागी खेळाडूंची दररोज कोरोना चाचणी होणार असून, कोणत्याही खेळाडूला हॉटेल आणि आयोजन स्थळाबाहेर जाण्याची परवानगी मिळणार नाही. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन हे उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. गलवान खोऱ्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतानेदेखील हिवाळी ऑलिम्पिककडे गांभीर्याने लक्ष घातलेले नाही. भारताचा एकमेव स्पर्धक ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे.भारताचा सोहळ्यावर बहिष्कारचीनने गलवान खोऱ्यातील संघर्षात सामील असलेल्या सैनिकाला टॉर्च बेअरर बनविताच भारताने कडाडून विरोध केला. ‘आमच्या देशाचे राजदूत कुठल्याही कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत,’ असे चोख प्रत्युत्तर भारताने दिले आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने गुरुवारी ही माहिती दिली. मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, ‘चीन ऑलिम्पिकआडून राजकारण खेळत आहे, ही दुर्दैवी बाब म्हणाली लागेल. बीजिंगमधील भारताचे कार्यवाहक राजदूत हिवाळी ऑलिम्पिकच्या उद्घाटनात किंवा समारोप सोहळ्यात सहभागी होणार नाहीत.’
हिवाळी ऑलिम्पिक आजपासून; जगाच्या नजरा चीनकडे!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2022 7:50 AM