रवी शास्त्री लिहितात...मागच्या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे भाग्य बंगळुरु संघाच्या बाजूने नव्हते हे स्पष्ट झाले. कधी खेळाडूंच्या जखमांची समस्या तर कधी खराब फॉर्म तर कधी निसर्गाचा कोप यामुळे आरसीबीला निराशा आली. या संघातील दिग्गजांना ‘शाप’ लागला की काय, असे जाणवू लागले आहे. आधी कोहली आणि डिव्हिलियर्सविना सामने खेळावे लागले. ‘लग्नाच्या पार्टीत नवरदेवाचीच अनुपस्थिती’असे हे चित्र होते.यामुळेच संघाला पराभव पत्करावा लागला. हळुहळु डिव्हिलियर्स व कोहली संघात आले. दोघांचेही यशस्वी आगमन झाले. गेल आणि वॉटसन हे अद्यापही खराब फॉर्मशी झुंज देत आहेत. आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध असलेला केदार जाधव मात्र बुरुज ढासळू नये यासाठी एकाकी संघर्ष करताना दिसतो. काही सामन्यात ख्रिस गेल आणि कोहली यांची बॅट तळपली. सलामीला १०० हून अधिक धावाही आल्या. २० षटकांत २०० वर धावा फळ्यावर लागल्या. गुजरात लायन्सला त्यांनी सहज धूळ चारली. संघ विजयी पथावर आला असे चित्र होते. पण केकेआरने पुढच्या सामन्यात त्यांना ४९ धावांवर बाद करीत घाम फोडला.हा केवळ ‘शाप’ म्हणावा लागेल. प्रकाशाविना सूर्य, आवाजाविना कोकिळा, डरकाळीविना वाघ आणि हवेविना वादळ हे समीकरण होऊच शकत नाही. बंगळुरुचा फलंदाजी क्रम पाहून कुणालाही हेवा वाटावा. संघातील दिग्गज मात्र स्वत:च्या प्रतिभेची छोटी झलक देखील दाखवू शकले नाहीत. पावसाच्या व्यत्ययामुळे तर संघाच्या भाग्यावरच गडद काळे ढग जमू लागले आहेत. आरसीबीला हरायचेच असेल तर झुंजारवृत्ती दाखवून हरावे. या संघाच्या दमदार फलंदाजीशिवाय आयपीएलची चमक कमी झाल्यासारखी वाटते. या संघाकडे सहा सामने शिल्लक आहेत पण पात्रता फेरी गाठणे कठीण दिसत आहे. त्यामुळे स्वत:च्या विश्वासावर चौफेर कामगिरी करणे हा एकमेव पर्याय उरतो. (टीसीएम)
आरसीबीच्या झंझावाताशिवाय आयपीएलच्या उत्साहावर विरजण
By admin | Published: April 27, 2017 12:45 AM