ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 10 - पुणे सुपरजायंट्स संघाचे मालक हर्ष गोयंका यांनी धोनीवर केलेल्या उपहासात्मक ट्विट्सना धोनीची पत्नी साक्षी हिने चोख प्रत्युत्तर दिले आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात धोनीला पुण्याच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर आयपीएलमधील पहिल्या सामन्यानंतर संघमालक गोयंका यांनी धोनीच्या खेळीवर टीका केली होती. तसेच स्मिथ आणि धोनीमध्ये तुलना करून त्याला कर्णधारपदावरून हटवण्याचा आपला निर्णय योग्य होता, असे ट्विट केले होते.
या ट्विटला साक्षी धोनीने हर्ष गोयंकांचे नाव न घेता प्रत्युत्तर दिले आहे. साक्षीने सोमवारी इस्टाग्रामवर कर्माचे नियम नावाचे एक छायाचित्र शेअर केले. जेव्हा पक्षी जिवंत असतो तेव्हा मुंग्या खातो, पण पक्षी मेल्यावर त्याला मुंग्या लागतात. वेळ आणि परिस्थिती कधीही बदलू शकते. त्यामुळे कुणीही कुणाला कमीपणा देता कामा नये. आज तुम्ही प्रबळ आहात, पण काळ तुमच्यापेक्षा बलवान आहे. एका झाडापासून काड्यापेटीच्या लाखो काड्या बनतात. पण त्यातील एक काडीसुद्धा अख्ख्या झाडाला जाळू शकते. त्यामुळे चांगले बना आणि चांगले कर्म करा. असा सल्ला साक्षीने या छायाचित्रातून देण्याचा प्रयत्न केला.
इंडियन प्रिमियर लिगच्या 10 व्या सत्राला सुरूवात होण्यापूर्वी पुणे सुपरजायंट्स संघाच्या कर्णधारपदावरून महेंद्र सिंग धोनीची हकालपट्टी करण्यात आली होती. त्याच्याऐवजी ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथकडे संघाची धूरा देण्याचा निर्णय पुणे संघाचे मालक हर्ष गोयंका यांनी जाहीर केला. त्यानंतर गोयंका यांनी ट्विटरवरून उघडपणे धोनीला लक्ष्य करण्यास सुरुवात केली. धोनीच्या खराब फॉर्मशिवाय हर्ष गोयंकासोबत त्याचे संबंध चांगले नसल्याचीही जोरदार चर्चा होती.