युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने (UWW) भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना मोठा दिलासा दिल्याचे दिसते. कारण एडहॉक समिती बरखास्त करण्यात आली असून भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आले आहे. मागील वर्षी ऑगस्टमध्ये महासंघाचे सदस्यत्व अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आले होते. वेळेत अध्यक्षपदाची निवडणूक न घेतल्याने ही कारवाई करण्यात आली होती. मात्र, आता भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (IOA) कुस्ती महासंघाचे निलंबन मागे घेतल्यानंतर खेळ चालवण्यासाठी एडहॉक समितीची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे या निर्णयानंतर महिला कुस्तीपटू नाराजी व्यक्त करत आहेत.
पैलवान साक्षी मलिकने सोशल मीडियावर एक पोस्ट करत यावरून नाराजी व्यक्त केली. ती म्हणाली की, मागील अनेक शतकांपासून देशातील शक्तिशाली लोकांनी महिलांच्या सन्मानाशी खेळ केला आहे. याचा इतिहास साक्षीदार आहे. आज एकविसाव्या शतकात आम्ही धाडस दाखवून अन्यायाविरूद्ध एकजुटीने आवाज उठवला आहे. आम्ही सर्वांनी मनापासून लढा दिला आहे. जेणेकरून भारतीय कुस्तीगीर संघटनेतील गैरप्रकार दूर व्हावेत आणि महिला कुस्तीपटूंना सुरक्षित वाटावे.
तसेच सरकारने कुस्ती संघटनेवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर ब्रिजभूषण आणि संजय सिंह हे निलंबन केवळ दिखावा आहे, आम्हाला काही दिवसांनी पुन्हा सेवेत घेतले जाईल आणि कुस्ती संघटनेवर आमचा कायमचा ताबा राहील, अशी विधाने ते करत राहिले. त्यांची ही विधाने खरी ठरली असून भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या या पत्राने यावर शिक्कामोर्तब झाला आहे. आजच्या नव्या भारतातही महिलांचा अपमान करण्याची जुनी परंपरा कायम राहणार असल्याचे सिद्ध झाले, अशा शब्दांत साक्षी मलिकने नाराजी व्यक्त केली.
साक्षी मलिकच्या पोस्टवर व्यक्त होताना विनेश फोगाटने म्हटले की, देशाचे पंतप्रधान हे स्पिन मास्टर आहेत. त्यांना त्यांच्या विरोधकांच्या भाषणांना तोंड देण्यासाठी 'महिला शक्ती'ला आवाहन करून मुद्दा कसा फिरवायचा हे माहित आहे. महिला कुस्तीपटूंची पिळवणूक करणाऱ्या ब्रिजभूषणने पुन्हा कुस्तीचा ताबा घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन करताना विनेश म्हणाली की, तुम्ही महिलांचा नुसता ढाल म्हणून वापर करून चालणार नाही, तर देशातील क्रीडा संस्थांमधून अशा अत्याचार करणाऱ्यांना हुसकावून लावण्यासाठी काहीतरी कराल, अशी आशा आहे.