नवी दिल्ली : भारतीय महिला बॉक्सिंग संघाला पहिल्यांदा मिळालेले विदेशी कोच स्टेफाने कोटालोर्डा यांनी राष्ट्रीय महासंघात व्यावसायिकेतेची उणीव तसेच वेतनातील दिरंगाईची तक्रार करीत पदभार सांभाळल्यावर एका महिन्यानंतर राजीनामादिला आहे.फ्रान्सचे कोटालोर्डा यांनी आॅगस्ट महिन्यात पदभार स्वीकारला होता. त्यांनी बॉक्सिंग महासंघाला मेलद्वारे राजीनामा पाठविला. जे आश्वासन दिले होते, ते पूर्ण करण्यासाठी दीर्घ प्रतीक्षा करू शकत नसल्याचे त्यांनी त्यात म्हटले आहे. कोटालोर्डा यांनी राजीनामापत्रात कठोर शब्द वापरले आहेत.ते म्हणतात, ‘मी फार वेळ संयम पाळला. जेथे भविष्याची खात्री नसेल अशा ठिकाणी कुणीही कुटुंबासोबत जाऊ शकणार नाही. मी वारंवार महासंघाला चिंता कळविली; पण कुठलेही लक्ष दिले गेले नाही. ई-मेल आणि वैयक्तिक विनंतीनंतरही आॅगस्टचे पूर्ण वेतन मिळालेले नाही; शिवाय निवासाचीही व्यवस्था नाही. मी स्वत: व्यवस्था केली तर खर्च कोण उचलणार, याचीही खात्री नाही. व्यावसायिकतेचा अभाव आणि कामाप्रति गंभीर नसणे, हे प्रशासकांच्या हलगर्जीपणाचे लक्षण झाले आहे. मी आता भारतात परतणार नाही. आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी करावी, यासाठी माझ्या शुभेच्छा.’महासंघाने मात्र कोटालोर्डा यांच्या अर्ध्याहून अधिक मागण्या मान्य करण्यात आल्याची माहिती दिली. त्यांना परत बोलावण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही सांगितले. (वृत्तसंस्था)भारताची आघाडीची महिला मुष्ठियोद्धा मेरी कोमला परदेशी प्रशिक्षक स्टिफन कोटलॉर्ड यांच्या राजीनाम्यामुळे धक्का बसला आहे. कोर्टलॉर्ड यांना आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्याबाबत ती आग्रह धरणार आहे. प्रशिक्षक झाल्यानंतर महिन्याभरातच राष्ट्रीय संघातील व्यावसायिकतेचा अभाव व अनियमित वेतन ही कारणे देत कोटलॉर्ड यांनी भारतीय मुष्ठियुद्ध संघटनेकडे आपला राजीनामा दिला आहे.मला देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्ती होण्यासाठी मी अजून वाट पाहू शकत नाही, असे कोटलॉर्ड यांनी म्हटले आहे. त्यांच्या या निर्णयाबद्दल मेरी कोम म्हणाली, ‘ही अत्यंत निराशाजनक गोष्ट आहे. संघाबरोबर असलेल्या व्यक्तींमधील ती एक चांगली व्यक्ती होती. इतकेच मी आता सांगू शकते. त्यांच्या गरजांबाबत आपण सजग असायला हवे. मी त्यांचे मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न करीन. ते परत येतील अशी मला आशा आहे.’
महिला बॉक्सिंग संघाच्या विदेशी कोचचा राजीनामा, व्यावसायिकतेचा अभाव, वेतनात दिरंगाईमुळे महिनाभरात सोडले पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 1:42 AM