मुंबई : ‘महिला बॉक्सिंगमध्ये आज खूप सुधारणा झाली आहे, पण खेळाडूंचे काय? त्यांच्या कामगिरीमध्ये कधी सुधारणा होणार,’ असा प्रश्न सहा वेळची जागतिक विजेती बॉक्सर मेरीकोम हिने उपस्थित केला. इंडियन फेडरेशन आॅफ स्पोर्ट गेमिंगच्या (आयएफएसजी) वतीने भारताच्या विविध युवा खेळाडूंना ‘स्टार्स आॅफ टुमॉरो’ (एसओटू) या उपक्रमांतर्गत मेरीकोमच्या हस्ते गौरविण्यात आले.बुधवारी मुंबईत झालेल्या या कार्यक्रमामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मेरीकोमने म्हटले की, ‘आज खेळामध्ये सोईसुविधांच्या बाबतीत मोठी सुधारणा झाली आहे. मात्र, त्या तुलनेत खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा झाली नाही. खेळाडूंसाठी चांगले साहित्य उपलब्ध असून खेळाडूंना मोठा पाठिंबाही मिळत आहे, परंतु तरीही कामगिरीत सुधारणा झालेली पाहण्यास मिळत नाही. खेळाडूंनी खेळताना विचारात्मक खेळ करावा. त्यांनी मानसिकरीत्या अधिक सक्षम होणे गरजेचे आहे, पण या गोष्टी त्यांच्यामध्ये पाहण्यास मिळत नाही. अनेक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा मोठा अनुभव असूनही, त्यांच्या खेळाचा स्तर मात्र म्हणावा तसा उंचावलेला नाही.’मेरीकोम पुढे म्हणाली की, ‘मी जेव्हा जागतिक स्पर्धेत पहिले दोन सुवर्ण पदक जिंकले, तेव्हाही अनेकांना माझ्या बाबतीत किंवा माझ्या कामगिरीची माहिती नव्हती. कोणतीही मदत मिळत नसल्याने मी एकटीच वाटचाल करत होती. बस, रेल्वेने प्रवास होत होता. एखाद्या स्पर्धेदरम्यान राहण्यासाठी साधी खोली मिळायची, पण या सर्व गोष्टी माझ्यासाठी एकप्रकारे चांगल्या ठरल्या. कारण यामुळे मला प्रतिकूल परिस्थितीतून पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली. जर मी एखाद्या श्रीमंत घरातील असते, तर मला कदाचित संघर्ष काय असतो, हे कळालेच नसते. त्यामुळे एका साधारण कुटुंबातून पुढे आल्याचा मला अभिमान आहे. यानंतर, तिसºयांदा व चौथ्यांदा जागतिक जेतेपद पटकावल्यानंतर मला पुरस्कर्ते मिळाले.’टोकियो २०२० सालच्या आॅलिम्पिक तयारीविषयी मेरीकोमने सांगितले की, ‘यंदाच्या जागतिक स्पर्धेत ५१ किलो वजनी गटात खेळलेल्या खेळाडूंवर मी लक्ष ठेवून होते. यापैकी एक-दोन खेळाडू आव्हानात्मक वाटले, पण इतर खेळाडू सर्वसाधारण असल्याने माझ्याकडे संधी आहे. या सर्व खेळाडूंचा आता व्यवस्थित अभ्यास करून, त्यानुसार मी योजना तयार करेन, शिवाय तयारी करताना योग्य साथीदार मिळणेही खूप आवश्यक असते, पण त्याची कमतरता आपल्याकडे भासते. इतर वजनी गटातील खेळाडूंकडूनही अपेक्षित मदत होत नाही. त्यांचे केवळ त्यांच्या खेळावर प्रेम आहे. देशाचा विचार त्यांच्याकडून झाला, तरच आपल्याला यश मिळू शकेल.’
सहावे जागतिक सुवर्ण पदक मिळविण्यात काहीच अडचण आली नाही. मला माझ्या तयारीवर पूर्ण विश्वास होता. आशियाई स्पर्धेतही मला विशेष स्पर्धा मिळाली नाही. पोलंडमध्ये झालेल्या स्पर्धेत मात्र तुलनेत चांगली लढत मिळाली. या स्पर्धेत जागतिक स्पर्धेत सहभाग घेतलेल्या बहुतेक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यामुळे तयारी चांगली झाली होती.
- एम. सी. मेरीकोम