नवी दिल्ली : पुढील वर्षी आयोजित विश्वचषकाची पात्रता गाठण्याचे लक्ष्य आखून भारतीय महिला हॉकी संघ आज शनिवारी विश्व हॉकी लीग सेमीफायनलसाठी जोहान्सबर्गकडे रवाना होत आहे. लीगचे आयोजन ८ जुलैपासून होईल.१८ सदस्यीय संघाचे नेतृत्व राणी रामपालकडे आहे. खेळाडू गेल्या सहा दिवसांपासून मुख्य कोच शोअर्ड मारिने यांच्या मार्गदर्शनात सराव करीत आहे. द. आफ्रिकेकडे रवाना होण्याच्या पूर्वसंध्येला बोलताना मारिने म्हणाले, ‘मागच्या आठवड्यात आम्ही १८ वर्षांखालील मुलांच्या संघासोबत सामना खेळला आमच्या खेळाडूंची खेळातील गती तपासणे हा सामने खेळविण्यामागे विचार होता. मुले वेगवान हॉकी खेळत असल्यामुळे आमच्या महिला खेळाडूंच्या शारीरिक हालचाली तसेच वेग याचा अभ्यास करता आला. जोहान्सबर्गच्या हवामानाशी ताळमेळ साधणे सोपे जावे यासाठी आम्ही भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या शिलारु केंद्रात सराव केला.’ संघाचे वैज्ञानिक सल्लागार व्हेन लोंबार्ड यांच्या मार्गदर्शनात संघाने व्यायाम केला आहे.यादरम्यान वेग वाढविण्यावर आणि फिटनेसवर भर देण्यात आला. तयारीची माहिती देताना कर्णधार राणी म्हणाली,‘आम्ही दिवसभरात चारवेळा सराव करीत होतो. पर्वताळ भागात सतत सराव करणे कठीण असते. सराव फारच कठोर स्वरूपाचा होता पण माझ्या सहकाऱ्यांचा विश्वचषकाची पात्रता गाठण्याचा निर्धार कायम असल्याने सराव करण्यात कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागला नाही. संघातील काही खेळाडूंचा अपवाद वगळता अनेक खेळाडूंना विश्वचषकाचा अनुभव नाही. यामुळे प्रत्येक सामन्यात अनुभवी खेळाडूंना स्वत:ची जबाबदारी ओळखून खेळ करावा लागणार आहे. ’स्पर्धेच्या ब गटात भारताला ८ जुलै रोजी द. आफ्रिकेविरुद्ध सलामीचा सामना खेळायचा आहे. त्याआधी ३ आणि ५ जुलै रोजी भारताचे इंग्लंड तसेच आयर्लंडविरुद्ध सराव सामने होतील.(वृत्तसंस्था)
महिला हॉकी संघ विश्व लीगसाठी आज रवाना होणार
By admin | Published: July 01, 2017 2:07 AM