ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. १५ - बांगलादेशने नाणेफेक कौल जिंकून भारताला प्रथम फलंदाजीस आंमत्रित केले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा भारताने दमदार सुरवात करताना पहिल्या ४ षटकात बिनबाद ३४ धावा केल्या होत्या. भारताकडून कर्णधार मिताली राजने १२ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने १६ धावा केल्या आहेत. तर वेलास्वामी वनिताने १२ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने १८ धावांचे योगदान दिले आहे. आजपासून महीला टी २० विश्वचषकास सुरवात झाली असुन सलामीचा सामना भारत आणि बांगलादेश दरम्यान चिन्नास्वामी स्टेडियम बंगळुरू येथे आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघानं यंदा जानेवारीत झालेल्या ट्वेन्टी२० मालिकेत ऑस्ट्रेलियावर २-१ने सनसनाटी विजय साजरा केला होता. त्यानंतर भारतीय महिलांनी श्रीलंकेलाही ३-०ने लोळवलं . भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेसाठी आपली दावेदारी स्पष्ट केली. हाच फॉर्म कायम राखून विश्वचषक पटकावण्यासाठी सज्ज झालेला भारतीय महिला संघ मंगळवारी होणाऱ्या बांगलादेशाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या काही मालिकांत चमकदार कामगिरी केल्याने यजमान भारताला उपांत्य फेरीसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे.
याआधी विश्वचषक टी-२० स्पर्धेत भारताने दोन वेळा उपांत्य फेरी गाठण्याची कामगिरी केली. मात्र, गेल्या दोन स्पर्धांत भारताला पहिल्याच फेरीतून गाशा गुंडाळावा लागला.
संघातील अनुभवी खेळाडू झूलन गोस्वामी व हरमनप्रीत कौर यांच्याकडे असलेल्या दीर्घ अनुभवामुळे त्यांच्यावर भारताची प्रमुख मदार असेल. याच वेळी भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारी व टी-२० क्रिकेटमध्ये हजारहून अधिक धावा काढणारी जगातील १३ फलंदाजांमध्ये समावेश असलेली कर्णधार मिताली राज भारताची हुकमी खेळाडू असेल.
दुसऱ्या बाजूला जहानारा आलमच्या नेतृत्वाखाली बांगलादेश आपली चमक दाखविण्यास मैदानात उतरेल
उभय संघ
भारत : मिताली राज (कर्णधार), झूलन गोस्वामी, एकता बिष्ट, राजेश्वरी गायकवाड, तिरुष कामिनी, हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णस्वामी, स्मृती मंधाना, निरंजना नागराजन, शिखा पांडे, अनुजा पाटील, दीप्ती शर्मा, वेलास्वामी वनिता, सुषमा वर्मा आणि पूनम यादव.
बांगलादेश : जहानार आलम (कर्णधार), सलमा खातून, निगार सुल्तान जोटी, पन्ना घोष, रुमाना अहमद, लता मंडल, रितू मोनी, आयशा रहमान, फाहिमा खातून, शरमीन अख्तर, फरगाना हक, खादिजा तुल कुबरा, नाहिदा अख्तर, शैली शारमीन आणि संदिजा इस्लाम.