मुंबई : फलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर वेस्ट इंडीजच्या महिलांनी न्यूझीलंडला ६ धावांनी नमवून पहिल्यांदाच टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. विजेतेपदासाठी विंडीजला तीन वेळा विश्वविजेतेपद पटकावलेल्या बलाढ्य आॅस्टे्रलिया विरुद्ध भिडावे लागेल. कर्णधार स्टेफनी टेलरचा अप्रतिम अष्टपैलू खेळ विंडीजच्या विजयात निर्णायक ठरला.वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या लढतीत वेस्ट इंडीजने दिलेल्या १४३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव ८ बाद १३७ असा रोखला गेला. न्यूझीलंडने अखेरच्या ५ षटकांत आक्रमणाच्या नादामध्ये विकेटस् गमावल्या. टेलरने १७व्या षटकाच्या दुसऱ्या व तिसऱ्या चेंडंूवर बळी घेत किवी संघाला दबावाखाली आणले, तर १९व्या षटकातही एक बळी घेत सामना पूर्णपणे संघाच्या बाजूने झुकविला. टेलरने २६ धावांत ३ बळी घेतले. न्यूझीलंडकडून सारा मॅकग्लॅशनने ३० चेंडूंत ३८ धावा फटकावून संघाकडून अपयशी झुंज दिली. अॅमी सॅट्टर्थवेट (२४) आणि सोफी डेवाईन (२२) यांनीही चांगली फलंदाजी केली.तत्पूर्वी, ब्रिटनी कूपरच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १४३ अशी मजल मारली. अडखळत्या सुरुवातीनंतर टेलर व कूपर यांनी ६० धावांची भागीदारी करून वेस्ट इंडीजचा डाव सावरला.संक्षिप्त धावफलक :वेस्ट इंडीज : २० षटकांत ६ बाद १४३ धावा (ब्रिटनी कूपर ६१, स्टेफनी टेलर २५, डिंड्रा डॉट्टीन २०; सोफी डिवाईन ४/२२, मोर्ना नीलसन १/१४) वि. वि. न्यूझीलंड : २० षटकांत ८ बाद १३७ धावा (सारा मॅकग्लॅशन ३८, अॅमी सॅट्टर्थवेट २४, सोफी डेवाईन २२; स्टेफनी टेलर ३/२५)
विंडीजचा महिला संघही अंतिम फेरीत
By admin | Published: April 01, 2016 3:56 AM