ऑनलाइन लोकमत
ब्रिस्टल, दि. 12 : महिला विश्वकप क्रिकेट स्पर्धेतील महत्त्वाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 8 विकेट्सनी पराभव केला. या सामन्यात पूनम राऊतने ठोकलेल्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी निर्धारित 50 षटकांत 227 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, ऑस्ट्रेलियाने 45.1 षटकात 227 धावांची खेळी करत भारतावर विजय मिळविला.
या सामन्यात मेग लॅनिंग हिने सर्वाधिक जास्त धावा केल्या. तिने 88 चेंडून एक षटकार आणि सात चौकार लगावत नाबाद 76 धावांची खेळी केली. तर, इलेसी पेसी हिने सुद्धा नाबाद राहून 67 चेंडूत आठ चौकारांची खेळी करत 60 धावा कुटल्या. बेथ मूनीने 45 धावा केल्या, तिला गोलंदाज दिप्ती शर्मा हिने धावबाद केले. निकोल बोल्टोन हिने 36 धावा केल्या.
याआधी, प्रथम फलंदाजी करताना भारताने कर्णधार मिताली राज आणि पूनम राऊतच्या खेळीच्या बळावर 50 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात 226 धावा केल्या होत्या. या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राच्या पूनम राऊतने शतक झळकावत संघाला मोठी धावसंख्या उभी करण्यात मोलाची भूमिका बजावली. मराठमोळ्या पूनम राऊतने 136 चेंडूचा सामना करताना 106 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान तिने 11 चौकार लगावले.
पूनमने कर्णधार मिताली राजसोबत दुसऱ्या विकेटसाठी 157 धावांची विक्रमी भागिदारी केली. मितालीने 67 धावांची खेळी करत पूनमला योग्य साथ दिली. भारताची सुरुवात आज निरशजनक झाली सलमीवीर स्मृती मानधना अवघ्या तीन धावांवर बाद झाली. अंतिम षटकात हाणामारीच्या षटकात हरमप्रीतने भारताची धावसंख्या झटपट वाढवली. हरमप्रीत कौरने 22 चेंडूत 23 धावांची खेळी केली. वेदा कृष्णमुर्ती आपली चमक दाखवू शकली नाही. ती शुन्य धावांवर बाद झाली. अखेरच्या षटकांत भारताने आपल्या विकेट बहाल केल्या.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरूद्ध सुरू असलेल्या सामन्यामध्ये मितालीने 6 हजार धावांचा टप्पा ओलांडला. 183 एकदिवसीय सामन्यांमध्ये मितालीने हा विक्रम केला. यापुर्वी इंग्लंडची खेळाडू शार्ले एडवर्डच्या नावावर हा विक्रम होता. शार्ले एडवर्डने 191 सामन्यांमध्ये 5992 धावा बनवल्या होत्या. यासाठी शार्ले एडवर्डने 191 सामन्यांपैकी 180 डावांमध्ये फलंदाजी केली तर मितालीने त्यापेक्षा 16 डाव कमी म्हणजे केवळ 164 डावांमध्येच हा रेकॉर्ड केला. आतापर्यंत मितालीने आपल्या करिअरमध्ये 5 शतकं आणि 48 अर्धशतकं ठोकली आहेत. विशेष म्हणजे तिने शतक ठोकलं, त्या प्रत्येक वेळी भारताला विजय मिळाला आहे. तिची फलंदाजीची सरासरी 51 आहे. सलग 7 अर्धशतकं ठोकण्याचा विक्रमही मितालीच्या नावावर आहे.