ऑनलाइन लोकमत
लीसेस्टर, दि. 8 - आयसीसी महिला क्रिकेट विश्चचषकात दक्षिण अफ्रिकेने भारतीय संघाची विजयी घोडदौड रोखत दणदणीत विजय मिळवला आहे. दक्षिण अफ्रिकेने 115 धावांनी भारताचा पराभव केला आहे. 274 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाचा डाव 158 धावांवरच आटोपला. भारताकडून दिप्ती शर्मा आणि झूलन गोस्वामी वगळता कोणीच मोठी खेळू करु शकलं नाही. दिप्ती शर्माने 60 तर झूलन गोस्वामीने नाबाद 43 धावा केल्या. स्मती मंधाना मोठी खेळी करु शकली नाही. ती चार धावांवरच आऊट झाली. कर्णधार मिताली राजही शून्यावर बाद झाली.
भारतीय संघाने टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. दक्षिण अफ्रिकेने भारतीय संघासमोर 274 धावांचं आव्हान ठेवलं होतं. दक्षिण अफ्रिकेने 50 ओव्हर्समध्ये नऊ विकेट्स गमावत 273 धावा केल्या होत्या. गेल्या सामन्यांमधील कामगिरी पाहता भारतीय संघ हे तगडं आव्हान सहज पेलेल असं वाटलं होतं. मात्र एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाची चांगलीच दमछाक झालेली दिसली.
दक्षिण अफ्रिकेच्या लिजेल लीने ताबडतोब फलंदाजी करत फक्त 65 चेंडूत 92 धावा काढल्या होत्या. लिजेल लीने आपल्या 92 धावांच्या स्फोटक खेळीत सात षटकार लगावले होते. मात्र ती शतक करु शकली नाही. हरमनप्रीत कौरने तिला पायचीत करत आऊट केलं. याशिवाय कर्णधार डेन वॉन नीकर्कने 57 धावांची खेळी केली होती. ती नाबाद राहिली. दक्षिण अफ्रिकेकडे मोठी धावसंख्या उभारण्याची संधी होती. मात्र विकेट्स गमावल्याने त्यांना 273 धावांवर रोखण्यात भारतीय संघाला यश मिळालं होतं. शेवटच्या फळीतील खेळाडू मोठी धावसंख्या उभारु शकले नव्हते.
भारताकडून शिखा पांडेने चांगली गोलंदाजी करत तीन विकेट्स घेतले होते. एकता बिश्त आणि हरमनप्रीत कौर यांना प्रत्येकी दोन विकेट्स मिळाले. एकता बिश्तने 9 ओव्हर्समध्ये 68 धावा दिल्या होत्या. झूलन गोस्वामी आणि पूनम यादवला प्रत्येकी एक विकेट मिळाली.