नवी दिल्ली: आशियाई विजेती पलक गुलिया हिने रिओ दी जानिरो येथे रविवारी 'आयएसएसएफ फायनल ऑलिम्पिक क्वालिफिकेशन चॅम्पियनशीपमध्ये महिलांच्या १० मीटर एअर पिस्टल स्पर्धेत कांस्यपद जिंकत देशासाठी नेमबाजीतील २०वा ऑलिम्पिक कोटा मिळवला. हरयाणातील झज्जरच्या १८ वर्षीय नेमबाज पलकने हांगझोउ आशियाई स्पर्धेत १० मीटर एअर पिस्टलमध्ये वैयक्तिक सुवर्ण आणि सांधित रौप्यपदक जिंकले होते. २४ शॉटच्या अंतिम फेरीत तिने संथ सुरुवातीनंतर सुधारणा करताना आघाडी घेतली. ती २२ लक्ष्यवेधानंतर २१७.६ गुणांसह कांस्यपदक निश्चित करत सामन्यातून बाहेर पडली. या लढतीत अर्मेनियाच्या एल्मिरा करापेटियन हिने सुवर्णपदक जिंकले, तर थायलंडच्या कामोनलाक साएंचा हिने रौप्य आणि ऑलिम्पिक कोटा मिळवला.
भारताने आता पिस्टल आणि रायफल स्पर्धेत कोणत्याही देशासाठी उपलब्ध कमाल १६ पॅरिस ऑलिम्पिक कोटा मिळविला आहे. भारत १९ एप्रिलला दोहा येथे आयोजित 'आयएसएसएफ फायनल ऑलिम्पिक क्वालिफिकेशन चॅम्पियनशीप "मध्ये पुरुष आणि महिलांच्या ट्रॅप आणि स्कीट स्पर्धेत पॅरिस ऑलिम्पिकसाठी चार कोटा निश्चित करू शकतो. पलक आणि सैन्यम यांनी शनिवारी ५७८ च्या समान गुणांसह सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर राहत फायनलसाठी पात्रता निश्चित केली. कारपेटियन वगळता अंतिम फेरीत पोहोचलेल्या नेमबाजांना ऑलिम्पिक कोटा मिळवण्याची संधी होती.
कारपेटियनला सुवर्ण कारपेटियनने याआधीच ऑलिम्पिक कोटा निश्चित केला आहे, पलक आणि सैन्यम यांनी अंतिम फेरीत खराब सुरुवात केली; पण दोघीही सुधारणा करण्यात यशस्वी ठरल्या. सैन्यमने आपले अभियान पाचव्या स्थानासह पूर्ण केले. कारपेटियनने २४०.७ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. साएंचा थोडक्यात दुसऱ्या स्थानावर राहिली.