ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. 10 - क्रिकेटच्या मैदानावर नेहमी वेगवेगळ्या घटना घडत असतात. मात्र, ऑस्ट्रेलियातील स्थानीक सामन्यांमध्ये घडलेली एक घटना कदाचीत क्रिकेटच्या मैदानात पहिल्यांदाच घडली असेल. सामन्यादरम्यान फलंदाज जतिंदर सिंग क्लिन बोल्ड झाला, गोलंदाजाने त्याचा मधला स्टंप उडवला पण आश्चर्य म्हणजे स्टंपच्यावर असलेल्या दोन्ही बेल्स मात्र तशाच ऑफ आणि लेग स्टंपला लटकून राहील्या. हा प्रकार पाहून अंपायरही हैराण झाले आणि फलंदाजाला बाद द्यायचं की नाही याबाबत संभ्रमात पडले. कारण बेल्स पडले नसतील तर फलंदाजाला बाद देता येत नाही असा क्रिकेटचा नियम आहे. अखेर बराच विचार करून त्यांनी फलंदाजाला बाद घोषीत केलं.
मूनी वेली आणि स्थ्रेटमोर हाइट्स या संघांमधील सामन्यादरम्यान हा विचित्र प्रकार घडला. सामन्यानंतर मुनी वेली संघाचा कर्णधार मायकल ओज्बन म्हणाला, ""ते अविश्वसनीय चित्र होतं, बेल्स 2 स्टंपवर लटकून राहील्या होत्या . बॉल मिडल स्टंपला लागल्यानंतर स्टंप उडाला नाही तर जागीच पडला. अंपायरनी आउट दिल्यानंतर त्यावर बराच विचार केल्यावर आम्ही जतिंदर सिंग आउट असल्याचं मान्य केलं"".
काय आहे क्रिकेटचे नियम-
एमसीसी क्रिकेट नियम 28 नुसार बेल्स पडले नसतील तर फलंदाजाला बाद देता येत नाही. बेल्स हलत असतील पण स्टंपवरून खाली पडल्या नसतील तरीही फलंदाजाला आउट देता येणार नाही. स्टंप पूर्णपणे उखडला गेला असेल तर फलंदाज आउट असल्याची शाश्वती मिळते असं हा नियम सांगतो. पण या घटनेमध्ये बॉल लागल्यानंतर स्टंप जागेवरच पडला तर बेल्स लटकून राहिल्या होत्या त्यामुळे आउट आहे की नाही याबाबत सर्वजण संभ्रमात होते. अखेर पंचांनी बराच विचार करून फलंदाजाला बाद ठरवलं.