पुणे : भारतीय हॉकी संघाने एशियन चॅम्पियन चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाचा ३-२ गोलने पराभव करून भारतीय हॉकीप्रेमींना दिवाळीची विशेष भेट दिली असल्याचे हॉकी इंडियाचे सरचिटणीस मोहम्मद मुश्ताक अहमद यांनी सांगितले. हॉकी महाराष्ट्राच्या वतीने आयोजिलेल्या पहिल्या फाईव्ह-अ-साईड हॉकी स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी मुश्ताक अहमद म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात आले होते, तेव्हा त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. अहमद म्हणाले, ‘‘भारतीय संघातील सुनील, मनदीप आणि श्रीजेश यांच्या थोडी तब्यतीची तक्रार होती, पण त्यांनी त्यातूनसुद्धा स्वत:ला सावरले. संघातील सर्वच खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून हे विजेतेपद जिंकले आहे. भारतीय हॉकी संघासाठी हा विजय खूप महत्त्वाचा आहे. कारण आगामी काळात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी भारतीय संघातील प्रत्येक खेळाडू आत्मविश्वास वाढणार आहे. शनिवारी उपांत्य फेरीत कोरियाविरुद्ध शूटआऊटमध्ये विजय संपादन करून त्यांनी आपल्या खेळाची चुणूक दाखविली होती. या विजयामुळेच खेळाडूंचे मनोबल उंचावले होते. या वेळी अहमद यांनी फाईव्ह-अ-साईड हॉकीबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, की हॉकीचा हा प्रकार खूप जलद आहे. यामुळे भारतीय हॉकी खेळाडूंना फास्ट पासेस, पुशेस, जलद ड्रिबलिंग करणे याचा अभ्यास होणार आहे. कारण या खेळात जोरात चेंडूला मारणे नाही, तुम्ही फक्त जास्तीत जास्त तंत्र (टेक्निक) वापरू शकता. याचा फायदा भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला (पुरुष व महिला) होईल, यात शंका नाही. भारतीय संघामध्ये सरदारसिंग बरोबरच रुपींदरपालसिंग, आकाशदीपसिंग, निक्किन, तलविंदर सिंग, रमणदीप हे चांगले खेळाडू मिळाले आहेत. यांच्याबरोबरच काही कनिष्ठ खेळाडूसुद्धा उत्कृष्ट कामगिरी करीत आहेत. श्रीजेशची अफलातून कामगिरीसुद्धा या स्पर्धेत वाकाबगण्यासारखे आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
खेळाडूंची अफलातून कामगिरी
By admin | Published: October 31, 2016 6:28 AM