World Archery Championships : जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय शिलेदारांनी चमकदार कामगिरी करून सुवर्ण पदकाला गवसणी घातली. महिलांनी मिळवलेल्या घवघवीत यशानंतर ओजस देवतळेने देखील सोनेरी कामगिरी करत सुवर्ण पटकावले. लक्षणीय बाब म्हणजे ओजस देवतळे हा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष तिरंदाज ठरला आहे. अंतिम फेरीत त्याने १५० गुण मिळवून सुवर्ण पदकावर शिक्कामोर्तब केला.
सध्या बर्लिन येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत भारतीय शिलेदारांनी अप्रतिम कामगिरी करत तिरंग्याची शान वाढवली. शुक्रवारी भारताच्या महिला खेळाडूंनी सांघिक अंतिम फेरीत देशासाठी पहिले सुवर्ण जिंकले. तर, शनिवारी अदिती स्वामीने वैयक्तिक सुवर्ण जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. लक्षणीय बाब म्हणजे १७ वर्षांची अदिती गोपीचंद स्वामी ही भारताची पहिली विश्वविजेती ठरली आहे. तिने महिलांच्या या स्पर्धेत सुवर्ण पटकावून तिरंग्याची शान वाढवली. खरं तर काल ज्योती सुरेखा वेन्नम, अदिती स्वामी आणि परनीत कौर यांनी जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला प्रथमच सुवर्णपदक जिंकून दिले. त्यांनी महिला कम्पाऊंड सांघिक गटाच्या अंतिम सामन्यात मेक्सिकोवर २३५-२२९ असा विजय मिळवला होता. आज देखील अदितीने सोनेरी कामगिरी करत वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकले. तिने शनिवारी जागतिक तिरंदाजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत मेक्सिकोच्या अँड्रिया बेसेरा हिला १४९-१४७ ने पराभूत करून कंपाऊंड तिरंदाजीमध्ये विश्वविजेतेपद मिळवले.
दरम्यान, अदिती ही भारतातील तिरंदाजीमधील पहिली वैयक्तिक जागतिक चॅम्पियन आहे. या कम्पाऊंडमध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे. या घवघवीत यशानंतर बोलताना अदितीने म्हटले, "माझ्या आतापर्यंतच्या सर्व प्रयत्नांना आज फळ मिळाले आहे. मी व्यासपीठावर ५२ सेकंदांचे राष्ट्रगीत वाजण्याची वाट पाहत होते... ही फक्त सुरुवात आहे, मला भारतासाठी पुढील आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकायचे आहे". ऐतिहासिक विजयानंतर अदिती भारावून गेल्याचे पाहायला मिळाले.