नवी दिल्ली : देशातील तिरंदाजांना टोकियो ऑलिम्पिकसाठी तयारी सुरू करता यावी यासाठी विश्व तिरंदाजी संघटनेने भारतीय तिरंदाजी संघटनेवरील (एएआय) निलंबन हटवावे, अशी विनंती सोमवारी भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी केली.विश्व तिरंदाजी प्रमुखांना लिहिलेल्या पत्रात बत्रा म्हणाले की, ‘विश्व संघटनेच्या पर्यवेक्षकाच्या देखरेखीखाली एएआयने योग्य आणि पारदर्शकपणे निवडणुका घेतल्या आहेत. त्यामुळे भारताला २०२० ऑलिम्पिकची तयारी सुरू करता यावी यासाठी त्यांच्यावरील निलंबन हटवायला हवे.’केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा शनिवारी तीन पर्यवेक्षकांच्या देखरेखीखाली अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेवानिवृत्त आयएएस अधिकारी बीवीपी राव यांचा ३४-१८ असा पराभव केला. एएआयचे माजी अध्यक्ष विजय कुमार मल्होत्रा यांच्या पाठिंब्यामुळे मुंडा यांच्या पूर्ण पॅनलने बाजी मारली. त्यांचा कार्यकाळ चार वर्षांचा असेल. निवडणूक दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार घेण्यात आली. विश्व तिरंदाजी आशिया विभागाचे उपाध्यक्ष चापोल आता त्यांचा अहवाल सादर करतील व त्या आधारावर विश्व संघटना सशर्त निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेईल.आॅलिम्पिकसाठी भारताने पुरुष गटात आधीच संघाचा कोटा व महिला गटात एक वैयक्तिक कोटा मिळवला आहे. त्याआधी मुंडा व राव यांच्या नेतृत्वाखालील दोन गटांनी गेल्या वर्षी जूनमध्ये नवी दिल्ली व चंदीगड येथे वेगवेगळ्या निवडणुका घेतल्या होत्या. (वृत्तसंस्था)
‘विश्व तिरंदाजीने एएआयचे निलंबन हटवावे’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 4:47 AM