World Athletics Championship - भारताच्यानीरज चोप्राने बुडापेस्ट येथे पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत नीरजने सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो भारताचा पहिला खेळाडू ठरला. यापूर्वी नीरजने २०२२ मध्ये रौप्यपदक जिंकून अंजू बॉबी जॉर्ज ( कांस्यपदक- लांब उडी, २००३) यांच्यानंतर जागतिक स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला होता. आज त्याने गोल्डन कामगिरी केली आणि आतापर्यंत एकाही भारतीयाला जागतिक स्पर्धेची दोन पदकं जिंकता आलेली नव्हती.
गोल्डन बॉय! नीरज चोप्राच्या जग जिंकणाऱ्या ऐतिहासिक कामगिरीचे व्हा साक्षीदार Video
आज चौथ्या क्रमांकावरून सुरुवात करणाऱ्या नीरजचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला. पण, त्याने दुसऱ्याच प्रयत्नात ८८.१७ मीटर लांब भाला फेकला अन् थेट अव्वल स्थानी पोहोचला. पाकिस्तानचा अर्शद नदीमने त्याच्या तिसऱ्या प्रयत्नात ८७.८२ मीटर अंतर पार करून भारताच्या गोल्डन बॉयला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. नीरजचे भालाफेकीचे अंतर पुढील तीन प्रयत्नात कमी कमी होतं गेलं, परंतु त्याचा दुसरा प्रयत्न फायनलमध्ये बेस्ट ठरला अन् त्याला पहिल्या स्थानावरून कोणीच हटवू शकले नाही. पाकिस्तानच्या अर्शदने रौप्य, तर झेक प्रजासत्ताकच्या याकुब व्हॅडलेच्जने ( ८६.६७ मी.) कांस्यपदक जिंकले.
या ऐतिहासिक कामगिरीनंतर नीरज म्हणाला, ''सर्वच बोलत होते की हेच एक पदक राहिले आहे आणि आज तेही पूर्ण झाले. ९० मीटरचं टार्गेट आजही पूर्ण करू शकलो नाही, पण सुवर्ण जिंकलो. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आता पुढे अजून बऱ्याच स्पर्धा आहेत आणि त्यात ९० मीटर भाला फेकण्याचा प्रयत्न नक्की करीन. त्या स्पर्धांमध्ये आणखी जास्त जोर लावेन. पहिला थ्रो मला चांगला फेकायचा होता, परंतु तांत्रिक फाऊल झाला. त्यानंतर थोडा निराश झालो, परंतु मी स्वतःला अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी पूश केलं. भारतवासीयांना हे सांगू इच्छितो की, हे तुमचं पदक आहे. आज जागे राहून माझी मॅच पाहणाऱ्या प्रत्येक भारतीयाचे आभार. मी आता ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियन आहे. तुम्हीही जगात देशाचे नाव मोठं करू शकता. त्यासाठी मेहनत करा, स्वतःवर विश्वास ठेवा.''