World Athletics Championship - भारताच्या पारुल चौधरीने ३००० मीटर स्टीपलचेस प्रकाराच्या अंतिम फेरीत पदक जरी पटकावले नसले तरी, तिने नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला. तिने ९:१५.३१ सेकंदाची वेळ नोंदवली आणि हा भारताचा नवा राष्ट्रीय विक्रम ठरला. तिने या कामगिरीसह २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीटही पक्के केले. फायनलमध्ये पारुलला ११व्या स्थानावर समाधान मानावे लागले. बहरीनच्या विनफ्रेड यावीने ८:५४.२९ सेकंदाच्या वर्ल्ड लिडींग वेळेसह सुवर्णपदक पक्के केले. केनियाची बीट्रीस चेपकोएच ( ८:५८.९८ सें.) आणि केनियाचीच फेथ चेरोथित ( ९:००.६९ सें.) अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकाची मानकरी ठरली.
पारुलने ९ मिनेटे २४.२९ सेकंदाची वेळ नोंदवून ५वा क्रमांक पटकावून फायनलमध्ये प्रवेश केला होता. ललिता बाबर ( २०१५) हिच्यानंतर जागतिक स्पर्धेच्या ३००० मीटर स्टीपलचेस प्रकाराची फायनल गाठणारी पारुल ही दुसरी भारतीय महिला ठरली आहे. पारुलने जुलै २०२३ मध्ये बँकॉक येथे पार पडलेल्या आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेतील सुवर्णपदक जिंकले होते.
मेरठची पारुल ही शेतकऱ्याची मुलगी आहे आणि एकेकाळी ती गावातून स्टेडियमपर्यंत पायी जात असे. पारुलने आतापर्यंत इतकी पदके जिंकली आहेत की एक संपूर्ण खोली पदकांनी भरून गेली आहे. चॅम्पियन पारुलचे वडील किशनपाल यांनी पदकाची खोली बनवली आहे.