World Athletics Championships 2022 : भारताच्या अंजू बॉबी जॉर्जने ( Anju Bobby George ) पॅरीस येथे २००३साली पार पडलेल्या जागतिक अॅथलेटीक्स स्पर्धेत लांब उडीत कांस्यपदक जिंकण्याचा पराक्रम केला होता. त्यानंतर आणि त्याआधी भारताच्या एकाही खेळाडूला World Athletics Championships स्पर्धेत पदक पटकावता आलेले नव्हते. यंदा हा दुष्काळ संपेल अशी आशा आहे आणि सर्वांचे लक्ष टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकीत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राकडे ( Neeraj Chopra) आहे. पण, आजच्या पहिल्या दिवसात महाराष्ट्राचा सुपूत्र अविनाश साबळे ( Avinash Sable) याने पदकाची आशा पल्लवीत केली. 3000 Metres Steeplechase Men ( ३००० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत) स्पर्धेच्या अंतिम फेरीत अविनाशने आपले स्थान पक्के केले.
२० किमी चालण्याच्या शर्यतीत भारताच्या खेळाडूंना अपयश आले. महिलांच्या शर्यतीत प्रियांकाला १:३९:४२ या वेळेसह ३४व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले, तर पुरुष गटात संदीप कुमार १:३१:५८ या वेळेसह ४०वा आला. १२ वर्षांच्या कारकीर्दित संदीपची ही सर्वात संथ वेळ ठरली. त्यानंतर ३००० मीटर स्टीपलचेस ( अडथळ्यांच्या शर्यतीत) स्पर्धेत अविनाशने कमाल केली. HEAT 3 मध्ये सहभागी असलेल्या अविनाशने १५०० मीटरपर्यंत अव्वल स्थान कायम राखले होते, परंतु त्यानंतर तो अचानक ६ व्या क्रमांकावर गेला. पण, शेवटच्या २०० मीटरमध्ये त्याने जोर लावला आणि अव्वल तीन स्पर्धकांमध्ये स्थान पटकावून अंतिम फेरीत प्रवेश केला. अविनाशने ८ मिनिटे १८.४४ सेंकदाची वेळ नोंदवली.
अविनाशचा प्रवास...महाराष्ट्राचा अविनाश साबळे आपल्या बीड जिल्ह्यातील मांडवा गावातील.... टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेनंतर अविनाश घरी परतला असताना त्याला कोरोनाची लागण झाली होती. पण, त्यातून सावरत पुन्हा मेहनत करत तो मैदानावर परतला. जागतिक अॅथलेटीक्स स्पर्धेत अविनाश इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. ३००० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत अविनाश सहभागी होणार आहे. २०२२मध्ये Rabat Diamond League मध्ये ३००० मीटर अडथळ्यांच्या शर्यातीत ८:१२.४८ सेकंदाची वेळ नोंदवताना राष्ट्रीय विक्रम केला. त्याने ९ वेळा स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडला. मार्च २०२२मध्ये त्याने इंडियन ग्रँड प्रिक्स २ मध्ये ८:१६.२१ सेकंदाची वेळ नोंदवली होती.
१३ सप्टेंबर १९९४ मध्ये अविनाशचा जन्म... वयाच्या सहाव्या वर्षापासून घर ते शाळा असा त्याचा रोजचा ६ किलोमीटरचा पायी प्रवास सुरू झाला. मग तो कधीकधी धावत हे अंतर पार करायचा तर कधी चालत... १२वीनंतर त्याने भारतीय सैन्यात 5 Mahar regiment मध्ये दाखल झाला. २०१३-१४ मध्ये सियाचिन येथे त्याची पोस्टींग झाली, तर २०१५मध्ये राजस्थान व सिक्कीम येथे त्याची पोस्टींग झाली होती. २०१५मध्ये त्याने आंतर-सैन्य क्रॉस कंट्री स्पर्धेत सहभाग घेतला. पण, ट्रेनर अमरिष कुमार यांनी त्याला स्टीपलचेल ( अडथळ्यांच्या शर्यतीत) सहभाग घेण्यास सांगितले. त्यानंतर त्याने ३ महिन्यांत २० किलो वजन घटवले.