Neeraj Chopra, World Athletics Championships : टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भालाफेकीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अंजू बॉबी जॉर्ज यांच्यानंतर जागतिक स्पर्धेत भारताला मागील १९ वर्षांत एकही पदक जिंकता आलेलं नाही. पदकाचा हा दुष्काळ नीरज चोप्राच संपवेल अशी सर्वांना अपेक्षा आहे आणि पात्रता फेरीत त्याने त्याची झलक दाखवून दिली. नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८८.३९ मीटर लांब भालाफेकला अन् अंतिम फेरीतील प्रवेश पक्का केला. त्याच्यापाठोपाठ झेक प्रजासत्ताकच्या जाकुब व्हॅद्लेचने ८५.२३ मीटरसह फायलनमधील स्थान पक्के केले. ८३.५०मीटर हे थेट फायनल प्रवेशासाठीचे लक्ष्य होते. नीरज प्रथमच या स्पर्धेत पदकाच्या शर्यतीत खेळणार आहे. अंतिम स्पर्धा रविवारी सकाळी ७.०५ वाजता होणार आहे.
India at World Athletics Championships: टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेनंतर ८ महिन्यांनी पुन्हा मैदानावर उतरलेल्या नीरजने मागील तीन सामन्यांत दमदार कामगिरी करून दाखवली. १४ जूनला फिनलँड येथील तुर्कू येथे झालेल्या Paavo Nurmi स्पर्धेत त्यानं ८९.३० मीटर लांब भालाफेक करून रौप्यपदक जिंकले होते. चार दिवसांनी फिनलँडच्या कौर्टने येथील स्पर्धेत त्याने ८६.६९ मीटरसह सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर ३० जूनला स्वीडन येथे पार पडलेल्या डायमंड लीग स्पर्धेत ८९.९४ मीटर लांब भाला फेकून राष्ट्रीय विक्रमासह रौप्यपदक नावावर केले होते.