महाराष्ट्राच्या अविनाश साबळेनं जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत बुधवारी ऐतिहासिक कामगिरी केली. त्यानं 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात स्वतःचा नॅशनल रेकॉर्ड मोडला आणि जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. जागतिक स्पर्धेत 3000 मीटर स्टीपलचेस प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवणारा अविनाश हा पहिलाच भारतीय पुरुष धावपटू असावा. पण, हे अंतिम फेरीतील स्थान त्याला सहज मिळालेले नाही, अत्यंत नाट्यमयरित्या त्याला हा प्रवेश मिळाला आहे.
2019च्या आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या अविनाशनं दोहा येथे सुरू असलेल्या स्पर्धेत तिसऱ्या हिटमध्ये तिसरे आणि एकूण 20वे स्थान पटकावले. त्यानं 8 मिनिटे 25.23 सेकंदाची वेळ नोंदवली, परंतु आयोजकांनी त्याला अंतिम फेरीत स्थान दिले नव्हते. प्रतिस्पर्धींमुळे अविनाशच्या मार्गात दोन वेळा अडथळा निर्माण झाला. तरीही अविनाशनं राष्ट्रीय विक्रमाची नोंद करत ही स्पर्धा पूर्ण केली.
कनिष्ठ गटातील विश्वविजेता टाकेले निगाटे ( इथोपिया) याच्यामुळे अविनाथच्या मार्गात अडथळा निर्माण केला आणि त्यामुळे भारतीय खेळाडूला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. पहिल्या घटनेत जेव्हा चार-पाच धावपटू एकमेकांवर पडले तेव्हा अविनाथच्या मार्गात अडथळा आला होता. ही बाब भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने आयोजकांच्या लक्षात आणून देताना अविनाशला अंतिम फेरीत समाविष्ट करून घेण्याची विनंती केली. आयोजकांनी त्यांची विनंती मान्य केली. 163.2च्या नियानुसार अविनाशला पुढील फेरीत प्रवेश मिळाला.
वयाच्या सहाव्या वर्षापासून अविनाशचं धावण्याशी नातं जोडलं गेलं. त्याला रोज घर ते शाळा असा 6 किमीचा प्रवास पायी करावा लागायचा. 12वीनंतर तो भारतीय सैन्यात 5 महार रेजिमेंटमध्ये रूजू झाला. 2013-14साली त्यानं सियाचिन ग्लेशियरवर पोस्टिंग केली.