दोहा : इंग्लंडच्या माइक रसेल याने धक्कादायक निकालाची नोंद करताना भारताच्या १७वेळचा विश्वविजेत्या पंकज अडवाणी आयबीएसएफ विश्व बिलियर्ड्स अजिंक्यपद मोठ्या स्वरुप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभूत केले. या अनपेक्षित विजयासह माइकने दिमाखात अंतिम फेरी गाठली असताना पंकजला कांस्य पदकावर समाधान मानावे लागेल.अंतिम फेरीसाठी आवश्यक असलेल्या १२५० गुणांची कमाई रसेलने अडवानीच्या अगोदर करुन दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात रसेलने १२५१-६२० अशी एकतर्फी बाजी मारली. सामन्यात अडवानीने आक्रमक आणि मजबूत सुरुवात केली. परंतु, माइकने मोक्याच्यावेळी खेळ उंचावून सामन्याचे चित्र पालटले. त्याने स्पर्धेतील सर्वोत्तम ५५१ चा ब्रेक करत आपले वर्चस्व राखले.विशेष म्हणजे या ब्रेकनंतर माइकने ४४७ गुणांचा जबरदस्त ब्रेक करुन आपली अंतिम फेरी निश्चित केली. जेतेपदासाठी माइकपुढे म्यानमारच्या नेइ थवाइ ओउ आणि इंग्लंडचा रॉबर्ट हॉल यांच्यातील विजेत्या खेळाडूचे आव्हान असेल.दरम्यान, या उपांत्य सामन्याआधी भारताच्या ध्रुव सितवाला आणि सौरव कोठाही या दोन्ही खेळाडूंचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाल्याने भारताच्या सर्व आशा अडवानीवर होत्या. (वृत्तसंस्था)
विश्व बिलियर्ड्स : पंकज अडवानीचे कांस्यपदकावर समाधान, रसेलविरुद्ध पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:58 AM