एकातेरिनबर्ग : ब्रिजेश यादवने (८१ किलो) मंगळवारी पोलंडच्या मेलुज गोइनस्कीचा पहिल्या फेरीत पराभव करीत भारताला विश्व पुरुष बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये विजयी सुरुवात करुन दिली.
भारतातर्फे यादव रिंगमध्ये उतरणारा एकमेव बॉक्सर ठरला. त्याने गोनिस्कीविरुद्ध ५-० ने सहज विजय मिळवला. या लढतीदरम्यान पोलंडच्या बॉक्सरच्या डोक्याला दुखापत झाली. यादवने हालचालीमध्ये वेग नसल्याची उणीव आपल्या जोरदार ठोश्यांनी भरुन काढली. त्याने प्रतिस्पर्धी बॉक्सरला कुठलीच संधी दिली नाही.
दुसऱ्या बाजूला गोनिस्कीने चांगली सुरुवात केली, पण त्याचा त्याला लाभ घेता आला नाही. लढत संपली तेव्हा मोठ्या प्रयत्नाने त्याला उभे राहता आले. या विजयासह यादवने राऊंड ३२ मध्ये स्थान मिळवले. येथे त्याला तुर्कीच्या बायरम मलकानच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. त्याला पहिल्या फेरीत बाय मिळाला होता. ही लढत रविवारी होईल. भारताचे तीन बॉक्सर्स अमित पंघाल (५२ किलो), कविंदर सिंग बिष्ट (५७ किलो) आणि आशिष कुमार (७५ किलो) यांना पहिल्या फेरीत बाय मिळाला आहे.