हॅम्बुर्ग : शिवा थापा आणि विकास कृष्ण यांच्या नेतृत्वात भारतीय बॉक्सिंग पथक आज शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या १९ व्या विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पदकांची संख्या वाढविण्याच्या अपेक्षेने खेळणार आहे.भारताने २००९, २०११ आणि २०१५ च्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदके जिंकली होती. शिवाने २०१५, विकासने २०११ आणि आता व्यावसायिक बनलेल्या विजेंदरने २००९ च्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये पदकांची कमाई केली. यंदा देशाचे आठ बॉक्सर रिंगणात उतरणार असून त्यांनी ताश्कंद येथे झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपद्वारे पात्रता गाठली होती.दोन वेळेचा आॅलिम्पियन शिवा म्हणाला,‘आॅलिम्पिकनंतर ही सर्वांत मोठी स्पर्धा असल्याने मी सज्ज आहे. आॅलिम्पिक व इतर स्पर्धांचा अनुभव पाठीशी असल्याचा लाभ होईल.’ शिवाने २०१५ मध्ये बँटमवेटमध्ये कांस्य जिंकले. यंदा लाईटवेट(६० किलो) प्रकारात खेळणार आहे. याच गटात तीन महिन्याआधी शिवाने आशियाई चॅम्पियनशिपचे रौप्य जिंकले आहे.विकासदेखील पदकाचा दावेदार आहे. आशियाई चॅम्पियनशिपचा उपांत्य सामना सोडून दिल्याबद्दल त्याची चांगलीच कानउघाडणी झाली होती. ७५ किलो गटात आशियाई सुवर्ण विजेता असलेल्या विकासने स्पर्धेची तयारी पतियाळाच्या तुलनेत पुण्याच्या सैनिक क्रीडा संस्थेत करण्यास प्राधान्य दिले होते.मनोज कुमार (६९ किलो) हा देखील पदकाचा दावेदार आहे. याशिवाय सुमित सांगवान(९१ किलो)याने दुखापतीतून पुनरागमन केले आहे. त्याने आशियाई स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. दहा दिवसांच्या स्पर्धेत ८५ देशांचे २८० स्पर्धक सहभागी होतील.(वृत्तसंस्था)भारतीय बॉक्सिंग संघअमित फांगल ( ४९ किलो), कविंदर बिश्त(५२ किलो ), गौरव विधुडी(५६ किलो), शिवा थापा (६० किलो), मनोज कुमार (६९ किलो), विकास कृष्ण (७५ किलो), सुमीत सांगवान (९१ किलो) आणि सतीश कुमार (९१ किलो पेक्षा अधिक).‘‘आशियाई चॅम्पियनशिपमध्ये आम्ही प्रत्येकी दोन रौप्य आणि कांस्य पदकांसह तिसरे स्थान पटकविले. आमची तयारी देखील चांगली आहे. मागच्यापेक्षा स्पर्धा वेगळी आहे. यंदा वजनगटात बदल झाल्याने रिओ आॅलिम्पिकमधील अनेक बॉक्सर्स आता दिसणार नाहीत. आम्हाला एका कांस्यपदकापेक्षा अधिक पदके मिळतील. खेळाडूंना देखील कामगिरीवर विश्वास आहे. भारतीय बॉक्सर्स फ्रान्स आणि झेक प्रजासत्ताकात स्पर्धा खेळून आले आहेत. त्यामुळे तयारी तर भक्कम झाली पण पदके किती मिळतील याबद्दल मी अंदाज वर्तविणार नाही.’’- सँटियागो नीवा, कोच भारत
विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिप आजपासून ;शिवा थापा, विकास कृष्णकडून अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 3:13 AM