हॅम्बर्ग : वाईल्ड कार्डच्या आधारे जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत प्रवेश मिळवलेल्या भारताच्या गौरव बिधूडीने दिमाखदार कामगिरी करताना उपांत्य फेरीत धडक मारली आणि भारताच्या नावावर एक पदक निश्चित केले. ट्यूनिशियाच्या बिलेल महमदी याला पराभवाचा धक्का देत गौरवने जागतिक स्पर्धेतील आपले पहिले पदक निश्चित केले.गौरवने बैंथमवेट (५६ किलो) गटात परीक्षकांच्या निर्णयाच्या जोरावर बाजी मारताना उपांत्य फेरीतील जागा निश्चित केली. दखल घेण्याची बाब म्हणजे, गौरवने आपल्या कारकिर्दीतील पहिल्याच जागतिक स्पर्धेत अंतिम चार खेळाडूंमध्ये जागा निश्चित केली. अशी कामगिरी करणारा तो भारताचा दुसरा बॉक्सर ठरला असून याआधी विकास कृष्णने २०११ मध्ये असा पराक्रम केला होता. या स्पर्धेच्या इतिहासामध्ये आतापर्यंत भारतासाठी विकाससह विजेंदर सिंग (२००९) आणि शिव थापा (२०१५) यांनी पदक जिंकले आहे. या तीन स्टार बॉक्सरच्या पंक्तीत गौरवने स्थान मिळवले आहे. गौरवने सुरुवातीपासूनच आपल्या लढतीत आक्रमक पवित्रा घेत प्रतिस्पर्धी महमदीला दबावाखाली ठेवण्यात यश मिळवले. त्याने अनेकदा महमदीला मागे हटण्यास भाग पाडले. तसेच, सुरुवातीला महमदीच्या कपाळाला किरकोळ जखमही झाली होती. दरम्यान, तिसºया फेरीपर्यंत महमदीचा चेहरा रक्तबंबाळ झाला होता. परंतु, तरीही त्याने काही चांगले पंच मारले. मात्र, गौरवने जोरदार प्रत्युत्तर देताना विजयावर शिक्कामोर्तब केले. (वृत्तसंस्था)खरं म्हणजे हे खूप वेगळं आहे. मी स्पर्धेत वाईल्ड कार्डने प्रवेश केला होता आणि आता मी पदकविजेता आहे. माझ्यासाठी सर्व काही लवकर झाले. मी कांस्यपदकाहून अधिक चांगली कामगिरी करून इतिहास रचण्याचा प्रयत्न करेल. गेल्या आठ महिन्यांपासून मी पाठदुखीपासून त्रस्त आहे. परंतु, कसाबसा मी खेळाशी जोडलो गेलो असून मला माझ्या मेहनतीचे फळ मिळाले आहे. - गौरव बिधूडी
जागतिक बॉक्सिंग, गौरवचे पदक निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 4:25 AM