हॅम्बर्ग : भारताचा युवा बॉक्सर गौरव बिधूडी (५६ किलो) याने आपल्या वजनी गटात अनपेक्षित आगेकूच करताना दिमाखात अंतिम फेरी गाठली आहे. त्याचवेळी, स्टार बॉक्सर शिव थापा अन्नातून विषबाधा होऊन आजारी पडल्याने रिंगमध्ये न उतरताचा स्पर्धेबाहेर पडला. पाचवे मानांकन लाभलेला शिव ६० किलो वजनी गटात जॉर्जियाच्या ओतार इरानोसियान विरुध्द लढणार होता. तसेच, पहिल्या लढतीत बाय मिळाल्यानंतर तो थेट दुसºया फेरीत खेळणार होता.अन्न विषबाधा आणि आजारी पडल्यामुळे शिवला आपल्या प्रतिस्पर्धीला वॉकओव्हर द्यावा लागला. भारतीय संघाच्या अधिकारीने वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘रविवारी पुर्ण रात्रभर त्याला उलट्या झाल्या आणि त्यानंतर सकाळी त्याला खूप ताप भरला. तो लढू शकणार नाही, त्याचे शरीर त्याला साथ देणार नाही. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले परंतु तो खूप कमजोर पडला आहे.’ दोन वेळा आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेला शिव भारताचा संभाव्य पदक विजेत्यांमध्ये आघाडीवर होता.दुसरीकडे, मनोज कुमार (६९ किलो) आपल्या वजनी गटातून पराभूत झाला. माजी राष्ट्रकुल सुवर्णविजेता असलेल्या मनोजला चौथ्या मानांकीत व्हेनेजुएलाच्या गॅब्रिएल माएस्टेÑ पेरेज याच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, युवा बॉक्सर गौरवने आपले चमकदार प्रदर्शन कायम ठेवले. त्याने उप-उपांत्यपुर्व फेरीत युक्रेनच्या मायकोला बुत्सेंको याला पराभूत करत भारतीय चमूला आनंदाचा क्षण दिला. दिल्लीकर असलेल्या गौरवला स्पर्धेत वाइल्ड कार्ड प्रवेश मिळाला होता आणि ही मिळालेली संधी त्याने चांगलीच साधली. गौरवने अनुभवी बुत्सेंकोला तोडीस तोड टक्कर देत परिक्षकांना आपल्या बाजूने निर्णय देण्यात भाग पाडले.विकास कृष्णला (७५ किलो) अनपेक्षित पराभवास सामोरे जावे लागल्याने भारताला मोठा धक्का बसला. पदकाचा प्रबळ दावेदार असलेल्या विकासला स्पर्धेच्या दुसºया फेरीतच आपला गाशा गुंडाळावा लागला. इंग्लंडच्या बेंजामिन विटेकर याने विकासला सहज नमवत आगेकूच केली. तसेच, आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्य विजेता सुमीत सांगवान (९१ किलो) याने विजयी कूच करताना परिक्षकांनी दिलेल्या निर्णयाच्या जोरावर आॅस्टेÑलियाच्या जेसनवेटलेला नमवले. (वृत्तसंस्था)
जागतिक बॉक्सिंग : स्टार बॉक्सर शिव थापा रिंगमध्ये न उतरताच स्पर्धेबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 3:59 AM