ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - भारत आणि पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीमुळे संपूर्ण देशभरात आज क्रिकेट फिव्हर चढला आहे. याआधी 2007 साली झालेल्या ट्वेंटी-20 विश्वचषकात भारतीय संघाने पाकिस्तानचा धुव्वा उडवत ट्वेंटी-20 विश्वचषक जिंकला होता हे तुम्हाला माहित असेलच, पण ट्वेंटी-20 विश्वचषकापूर्वीसुद्धा एका जागतिक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघ आमने-सामने आले होते. ती स्पर्धा होती 1985 साली ऑस्ट्रेलियात झालेली बेन्सन अँड हेजेस वर्ल्ड चॅम्पियनशिप. त्यावेळी भारत आणि पाकिस्तानचे संघ अंतिम फेरीत एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्या अंतिम लढतीत सुनील गावसकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव करत विश्वविजेतेपद पटकावले होते.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयोजित केलेल्या या स्पर्धेत क्रिकेटमधील आघाडीचे सात संघ सहभागी झाले होते. त्यावेळचा विश्वविजेता भारत, उपविजेता वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि श्रीलंका अशा सात संघांमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघ दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत पोहोचला होता. अंतिम लढतीत भारताच्या समोर होता कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान. एकतर्फी झालेल्या अंतिम लढतीत कपिल देव, चेतन शर्मा आणि शिवरामाकृष्णन यांच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानला 50 षटकात केवळ 176 धावाच करता आल्या होत्या. त्यानंतर रवी शास्री आणि श्रीकांत यांनी फटकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारतीय संघ पाकिस्तानचा 8 गडी राखून धुव्वा उडवत विजेता ठरला होता. तर अंतिम सामना आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या रवी शास्रीला बक्षीस म्हणून ऑडी कार देण्यात आली होती. ही ऑडी तेव्हा भारतात चर्चेचा विषय ठरली होती.