ऑनलाइन लोकमत
डर्बी, दि. 24 - आयसीसी महिला विश्वकप क्रिकेट स्पर्धेतील सलामीच्या सामन्यातच भारताने इंग्लंडचा 35 धावांनी पराभव केला आहे. इंग्लंडचा पराभव करत भारताने आपण प्रबळ दावेदार असल्याचं दाखवून दिलं आहे. भारतीय संघातील सलामीच्या फलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारताने अत्यंत सहजपणे हा सामना जिंकत इंग्लंडला पराभवाची धूळ चाखली.
भारताने प्रथम फलंदाजी करत फक्त तीन विकेट्स गमावत एकूण 281 धावा केल्या होत्या. स्मृती मानधनाने ताबडतोब फलंदाजी करत फक्त 72 चेंडूत 90 धावा केल्या. पहिल्या विकेटसाठी पूनम राऊतसोबत स्मृतीने 144 धावांची भागिदारी केली. पूनम राऊतने 134 चेंडूत 86 धावा केल्या. कर्णधार मिताली राजनेही उत्कृष्ट फलंदाजी केली. ती 71 धावांवर नाबाद राहिली. मिताली राजने एकदिवसीय सामन्यातील सलग सातवं अर्धशतक केलं.
281 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघाला 246 भारतीय संघाने 246 धावांत गारद केलं. भारताने 35 धावांनी त्यांचा पराभव केला. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षात भारताने इंग्लंडविरोधात मिळवलेला हा पहिला विजय आहे. याआधी झालेले सहा सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. इंग्लंडचे खेळाडू मोठी भागिदारी करण्यात अपयशी ठरले. फ्रॅन विल्सन वगळता एकही खेळाडू जास्त वेळ टिकू शकली नाही. विल्सनने 102 चेंडूत 81 धावा केल्या. तिचा रन आऊट सामन्यातील टर्निग पॉईंट ठरला. ऑफ स्पिनर दिप्ती शर्माने 47 धावांच्या बदल्यात तीन विकेट्स घेतल्या.
भारताला अद्याप विश्वविजेतेपद पटकावता आलेले नाही. यावेळी पात्रता फेरीचा अडथळा पार करीत आठ संघांचा समावेश असलेल्या स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध तीन सामने खेळले असते, तर विश्वकप २०१७साठी त्यांना थेट पात्रता मिळवता आली असती, पण आयसीसी महिला चॅम्पियनशिपमध्ये परंपरागत प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध सामना न खेळल्यामुळे भारताला सहा गुणांचे नुकसान सोसावे लागले. भारत गुणतालिकेत १९ अंकासह पाचव्या स्थानी होता. त्यामुळे भारतीय संघाला श्रीलंकेमध्ये पात्रता फेरी खेळावी लागली. भारताने या स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. रंगतदार अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक गडी राखून विजय मिळवला होता.
मिताली राजच्या रूपाने भारताकडे सर्वांत अनुभवी खेळाडू आहे. अलीकडेच १०० वन-डे सामन्यांत संघाचे नेतृत्व करणारी ती जगातील तिसरी महिला खेळाडू ठरली आहे. तिने सलग सहा सामन्यांत अर्धशतक झळकावले. मिताली कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सराव सामन्यात मितालीने ८५ धावांची खेळी केली होती. भारताने या लढतीत १०९ धावांनी विजय मिळवला होता.