ऑनलाइन लोकमत
मिरपूर, दि. २८ - १९ वर्षाखालील मर्यादित षटकांच्या विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात आज भारताने आयर्लंडचा ७९ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने आयर्लंडसमोर विजयासाठी २६९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने प्रथम फलंदाजी करताना सर्फराज (७४) आणि सुंदर (६२) यांच्या अर्धशतकाच्या बळावर २६८ धावांचा डोगंर उभा केला होता. सर्फराज आणि सुंदर यांनी पाचव्या विकेट साठी ११० धावांची भागीदारी केली. भारताच्या१७९ धावांचा पाठलाग करताना आयर्लंडचा संघ १८९ धावापर्यंत मजल मारु शकला.
१९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारतीय संघाने ‘ड’ गटात आयर्लंडचा पराभव करत स्पर्धेची सुरवात विजयाने केली आहे. दिग्गज भारतीय फलंदाज राहुल द्रविड याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ या स्पर्धेची सुरुवात मोठ्या विजयासह केली असेच म्हणावे लागेल.
भारताने यापूर्वी तीन वेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावलेले आहे. भविष्यातील क्रिकेट खेळाडू शोधण्याच्या दृष्टीने या स्पर्धेकडे पाहिले जाते. या स्पर्धेतून भारताला विराट कोहली, युवराज सिंग यासारखे खेळाडू मिळाले आहेत. यावेळीही इशान किशन, रिषभ पंत, अवेश खान हे खेळाडू आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यास उत्सुक आहेत.
सुरक्षेच्या कारणास्तव ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. यामुळे या स्पर्धेचे जेतेपद पटकावण्यासाठी भारताला फार मोठी संधी आहे.