नवी दिल्ली : पुढील वर्षी भारतात ट्वेंटी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या ट्रॉफीचा १२ देशांच्या प्रवासास रविवारपासून प्रारंभ होत आहे.आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी सांगितले, ‘‘ट्रॉफीच्या या प्रवासादरम्यान क्रिकेट चाहत्यांनादेखील ही ट्रॉफी जवळून पाहण्याची संधी मिळेल. ट्रॉफी २ महिन्यांच्या मोठ्या प्रवासासाठी १३ डिसेंबरला मुंबई येथून रवाना होईल आणि पुढील वर्षी १ फेब्रुवारी २०१६ रोजी दिल्लीत परतेल. यादरम्यान वर्ल्डकपची ही ट्रॉफी १२ देशांचा प्रवास करील आणि तमाम क्रिकेट चाहत्यांना ती पाहता येईल. प्रवासादरम्यान ही ट्रॉफी विविध देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांदरम्यान दाखविली जाणार आहे आणि ट्रॉफीला जवळून पाहणे, हा चाहत्यांसाठी रोमहर्षक क्षण असेल. वर्ल्डकपआधी ट्रॉफीचा पूर्ण प्रवास होईल आणि हा प्रवास यशस्वी होईल, अशी आम्हाला पूर्ण आशा आहे.’’वर्ल्डकप ट्रॉफी सर्वांत आधी १३ डिसेंबरला स्कॉटलंडला पोहोचणार आहे. त्यानंतर आयर्लंड, इंग्लंड आणि हॉलंडमार्गे २ जानेवारी २०१६ला झिम्बाब्वेला पोहोचेल. त्यानंतर ५ जानेवारीला दक्षिण आफ्रिका व आशिया खंडात सर्वांत आधी ११ जानेवारीला पाकिस्तानात पोहोचेल. वर्ल्डकप ट्रॉफी त्यानंतर १४ जानेवारीला बांगलादेश, १७ जानेवारीला श्रीलंका, २१ जानेवारीला न्यूझीलंडमध्ये चाहत्यांना दाखविली जाणार आहे. २६ ते ३१ जानेवारी रोजी आॅस्ट्रेलियातील विविध स्थळी भेट दिल्यानंतर ही ट्रॉफी १ फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीला पोहोचेल.(वृत्तसंस्था)
वर्ल्डकप ट्रॉफी करणार १२ देशांचा प्रवास
By admin | Published: December 13, 2015 2:36 AM