कोल्हापूर : जगप्रसिद्ध मल्ल सादिक पंजाबी यांचे पाकिस्तानातील लाहोर शहरात राहते घरी बुधवारी निधन झाले. विशेष १९६० दशकात ते कोल्हापुरातील शाहू विजयी गंगावेश या तालमीत सराव करीत होते. यानिमित्त त्यांच्या आठवणींना कोल्हापुरातील मल्ल क्षेत्रातून पुन्हा एकदा उजाळा मिळाला .
पाकिस्तान मधील लाहोर शहराचे सुपूत्र सादिक याचे वडील निका हे शाहू महाराजांचे दत्तक मल्ल होते.कोल्हापूरात त्यांना खासबाग मैदानात पराभव पत्करावा लागला होता. त्याच वेळी त्यांनी शपथ घेतली की येणाऱ्या काळात माझ्या मुलाला पैलवान बनवून याच मैदानात जिंकायला लावीन.ते पाकिस्तानात परतले आणि काही वर्षांनी निका पैलवान आपल्या कोवळ्या मुलाला सादिक ला घेऊन कोल्हापूरात आले.मुलाला मोठे पैलवान बनवण्यासाठी निका स्वतः त्याला खुराक,स्वयंपाक बनवून घालत असे,स्वतः मोजून त्याचा व्यायाम घेत होते.
सादिकला एखादी कुस्ती मैदानात जड गेली की ते सादिक ला दोष देत नसायचे कारण त्याच्या कुस्ती मेहनतीवर त्याचा पुरता विश्वास होता.ते दुधाची म्हैस बदलत असे.सादिक ची विष्ठा तपासून पचनशक्ती व्यवस्थित आहे का पाहत असे.जसा खुराक देण्यात ते कटिबद्ध होते तसेच मेहनत सुद्धा घेण्यात त्यांचा हातखंडा होता. गंगावेश मध्ये पहाटे ३ वाजता उठून सादिक ला ३००० बैठका मारून आखाडा उकरून लढत करायला लावत असे.एक दिवस निका वस्ताद सकाळी उठले नाहीत, मात्र सादिक पैलवान उठून ३००० बैठक मारून हौद्यात उतरले. तितक्यात निका वस्ताद यांना जाग आली व सादिक ला आखाड्यात बघितले तसे त्याना पुन्हा वर बोलवत ३००० बैठका मारायला लावल्या.
माझ्या डोळ्यादेखत बैठका मारून मगच पुढील व्यायाम असा त्यांचा शिरस्ता होता.याच जिद्दीने,खुरकाने,व्यायामाने सादिक देशाचे क्रमांक एकचे मल्ल घडले.ज्या खासबागेत वडिलांचा पराभव झाला तिथे त्यांनी अनेक बलाढ्य मल्ल चितपट करून विजयी आरोळी ठोकली.पुढे निका त्यांच्या देशात परतले. मात्र सादिक पुढे काही वर्षे महाराष्ट्रातच राहिले. या काळात कोल्हापूरातील राष्ट्रीय तालीम संघाचे बाळ गायकवाड यांच्याशी त्यांचे घनिष्ट संबंध आले. कोल्हापूरातील त्यावेळी नामवंत दिग्गज मल्ल पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, हिंदकेसरी दिनानाथ सिंह, हिंदकेसरी मारुती माने, मोहम्मद हनिफआणि विष्णू सावर्डे, गोगा पंजाबी यांच्याशी त्यांच्या कुस्त्या झाल्या .
मठ तालमीतून कुस्ती मेहनत करुन मलमली तीन बटनी कुर्ता व सफेद लुंगी लावून लाल भडक कोल्हापुरी चप्पल करकर वाजवत ज्यावेळी सादिक कोल्हापूर च्या रस्त्यावरून चालायचा त्यावेळी साऱ्यांच्या नजरा त्या देखण्या ,धिप्पाड शरीराकडे पदायचे मात्र सादिकने नजरेने कधी भुई सोडली नाही. संस्कारी व सौंदर्य संपन्न पैलवान होणे नाही.आज सादिक पंजाबी गेल्याची बातमी वाचली आणि मन सुन्न झाले, अशी प्रतिक्रिया हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांनी दिली.