दोहा : भारताचा स्टार क्यू खेळाडू पंकज अडवाणी याने आपले कमालीचे सातत्य कायम राखताना तब्बल १८व्यांदा आयबीएसएफ जागतिक स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद उंचावले. पंकजने १८वे शानदार विश्व जेतेपद पटकावताना इराणच्या आमिर सरखोश याचे आव्हान परतावले.अल-अरबी स्पोटर््स क्लब येथे झालेल्या या अंतिम सामन्यात पंकजने ८-२ अशी एकतर्फी बाजी मारत आपल्या खात्यात आणखी एका विश्व विजेतेपदाची भर टाकली. बेस्ट आॅफ १५ यानुसार खेळविण्यात आलेल्या या लढतीत सरखोशने पहिला फ्रेम जिंकत अनपेक्षित सुरुवात केली होती. मात्र, यानंतर पंकजने सलग चार फ्रेम जिंकताना ४-१ अशी आघाडी मिळवत आपला हिसका दिला. सहाव्या फ्रेममध्ये पुन्हा एकदा सरखोशने १३४ गुणांसह बाजी मारत आपली पिछाडी २-४ अशी कमी केली. मात्र, यानंतर जराही एकाग्रता न गमावलेल्या पंकजने जबरदस्त नियंत्रण सादर करताना पुन्हा एकदा सलग चार फ्रेम जिंकत सुवर्ण पदक आपल्या नावावर केले.एकतर्फी झालेल्या या लढतीत पंकजने १९-७१, ७९-५३, ९८-२३, ६९-६२, ६०-०५, ०-१३४, ७५-०७, १०३-०४, ७७-१३, ६७-४७ असा दिमाखदार विजय मिळवला. याआधी झालेल्या उपांत्य सामन्यात पंकजने आॅस्ट्रियाच्या युवा फ्लोरियन नूबल याचे आव्हान७-४ असे संपुष्टात आणले होते.११ पैकी ४ फ्रेम जिंकत नूबलनेआपली चमक दाखवली खरी; परंतु कसलेल्या पंकजपुढे त्याचा निभाव लागला नाही. (वृत्तसंस्था)
जागतिक स्नूकर : पंकज अडवानीचा १८वा पराक्रम, इराणच्या आमिरला नमवून मिळवले जेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 2:13 AM