ह्यूस्टन : विश्व टेबल टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारणाऱ्या भारताच्या मनिका बत्राला या दोन्ही प्रकारात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे विश्व टेबल टेनिस स्पर्धेत पदक जिंकण्याच्या तिच्या आशा धुळीस मिळाल्या. ऐतिहासिक पदक जिंकण्यापासून एक पाऊल दूर असलेल्या मनिका आणि जी. साथियान या भारताच्या मिश्र दुहेरीच्या जोडीला उपांत्यपूर्व फेरीत जापानच्या तोमाकाजू हरिमोतो आणि हिना हयाता या जोडीकडून १-३ (५-११, २-११, ११-७, ९-११) असा पराभव पत्करावा लागला. हा सामना जिंकून ऐतिहासिक कामगीरी करण्याची मनिका आणि जी. साथियान या जोडीकडे संधी होती. मात्र त्यांना अपयश आले. दुसरीकडे महिलांच्या दुहेरीमध्ये अर्चना कामथच्या जोडीने खेळताना मनिकाला उपांत्यपूर्व फेरीतच पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला. एकतर्फी सामन्यात लग्जमबर्गच्या साराह डी नुटे आणि नी शिया लियान या जोडीने त्यांचा ०-३ (१-११, ६-११, ८-११) असा पराभव केला. या दोनपैकी एक सामना जिंकून पदक निश्चित करण्याचा मनिका बत्राचा प्रयत्न होता. मात्र त्यात तिला यश आले नाही. त्यामुळे या स्पर्धेतून मनिकाला रिकाम्या हाताने मायदेशी परतावे लागेल.
World Table Tennis Championship: मनिका बत्रा जागतिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 5:59 AM