कोलंबो : कर्णधार मिताली राज आणि सलामीची फलंदाज मोना मेश्राम यांची बॅट आज पुन्हा तळपली. या दोघींच्या शानदार खेळीच्या बळावर भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक पात्रता फेरीच्या सुपरसिक्स लढतीत बांगला देशचा ९९ चेंडू आधीच नऊ गड्यांनी पराभव करीत मुख्य फेरी गाठली. महिला विश्वचषकाचे आयोजन इंग्लंडमध्ये २४ जून ते २३ जुलै या कालावधीत होणार आहे.भारताची कर्णधार मिताली राजने बांगलादेशला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भेदक माऱ्याच्या बळावर भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला ५० षटकांत ८ बाद १५५ धावांवर रोखले. फरजाना हक (५०) आणि शमीन अख्तर (३५) यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज धावा काढण्यात अपयशी ठरले. भारताकडून मध्यम जलद गोलंदाज मानसी जोशीने २५ धावांत तीन आणि देविका वैद्यने १७ धावांत दोन गडी बाद केले.मितालीने नाबाद ७३ आणि मोना मेश्रामने नाबाद ७८ धावा ठोकून दुसऱ्या गड्यासाठी १३६ धावांची भागीदारी करताच ३३.३ षटकांत एक बाद १५८ धावांवर विजय साकार झाला. त्याआधी दीप्ती शर्मा (२२ चेंडूत १ धाव) नवव्या षटकांत बाद झाली. मितालीने ८७ चेंडू टोलवित दहा चौकार आणि एक षट्कार मारला. मोनाने ९२ चेंडूंत १२ चौकार ठोकले. साखळीत सर्वच सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाचे सुपरसिक्समध्ये चार सामन्यांतून आठ गुण झाले. त्यामुळे अंतिम फेरीतील स्थान निश्चित झाले आहे. (वृत्तसंस्था)भारताप्रमाणे दक्षिण आफ्रिका देखील पात्रता गाठण्यात यशस्वी ठरला. आफ्रिकेने श्रीलंकेवर ८३ चेंडू शिल्लक राखून ९ गड्यांनी विजय साजरा केला. आफ्रिका संघाचे सहा गुण झाले झाले. साखळी फेरीत अपराजित राहिल्यानंतर हा संघ सुपरसिक्समध्ये भारताकडून पराभूत झाला होता. लंकेने प्रथम फलंदाजी करीत ९ बाद १४५ धावा उभारल्या. निपुनी हंसिकाने सर्वाधिक ४८ धावा केल्या. द. आफ्रिकेने लॉरा वोवॉल्ट नाबाद ५० आणि सून लुस नाबाद ५० यांच्या अर्धशतकी खेळीमुळे ३६.१ षटकांत १४५ धावा करीत विजय साकार केला. पाकने आयर्लंडचा ८६ धावांनी पराभव केला. पाकने ५ बाद २७१ धावा उभारल्यानंतर आयर्लंडला ४८.५ षटकांत १८५ धावांत बाद केले.
भारतीय महिलांना वर्ल्डकपचे ‘तिकीट’
By admin | Published: February 18, 2017 1:18 AM