नूर सुलतान (कझाखस्तान) : येथे आज, शनिवारपासून सुरू होत असलेल्या विश्व कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या स्टार मल्लांचा खरा कस लागणार आहे. येथे पदकाची प्रतिष्ठा कायम राखण्याचे आणि टोकियो आॅलिम्पिकची पात्रता गाठण्याचे दुहेरी आव्हान खेळाडूंपुढे असेल.
विश्व चॅम्पियनशिपआधी बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी शानदार कामगिरी केली. दिव्या काकारन हिने देखील चांगला निकाल देत आत्मविश्वास वाढविला. बजरंगने या सत्रात डेन कोलोव, आशियाई चॅम्पियनशिप, अली अविव आणि यासेर डोगू या सर्व चार स्पर्धा जिंकल्या. आता विश्व चॅम्पियनशिपमध्ये ६५ किलो वजनगटात जगात नंबर वन असलेला बजरंग येथे मॅटवर खेळणार आहे.
विनेशने नव्या वजनगटात या मोसमाची तयारी सुरू केली असून ती ५० ऐवजी ५३ किलो वजनगटात खेळणार आहे. नव्या वजनगटात ताळमेळ साधण्यासाठी विनेशला काहीवेळ लागला तरीही तिने यासर डोगू, स्पेनमधील ग्रॅन्डप्रिक्स आणि पोलंड ओपनमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. मागच्यावर्षी ढोपराच्या जखमेमुळे विनेशला बुडापेस्ट स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. विश्व चॅम्पियनशिपमध्ये एकाही भारतीय महिला मल्लाने सुवर्णपदक जिंकलेले नाही. अशावेळी विनेशकडे सुवर्णाचा दुष्काळ संपविण्याची संधी असेल.
विश्वकुस्तीच्या फ्री स्टाईलमध्ये केवळ सुशीलकुमारने विश्व विजेतेपद पटकाविले आहे. आता बजरंगकडे ही संधी असेल. २५ वर्षांच्या बजरंगने दोनदा विश्वस्पर्धेत पदक जिंकले. पण सुवर्णाची अद्यापही प्रतीक्षा कायम आहे. सुवर्णपदकासाठी बजरंगपुढे रशियाचा राशिदोव आणि बहरीनचा हाजी मोहम्मद अली यांचे कडवे आव्हान असेल. दोनवेळेचा ऑलिम्पिक पदक विजेता सुशीलकुमार हा गेल्या काही महिन्यांपासून ऑफ फॉर्म आहे. ७४ किलोगटात त्याची कामगिरी कशी होते, याकडे अनेकांची नजर असेल.
साक्षी मलिक हिलादेखील आंतरराष्ट्रीय पातळीवर सतत अपयश येत आहे. तिने २०१७ च्या राष्ट्रकुलमध्ये जिंकल्यानंतर एकही पदक पटकाविलेले नाही. दीर्घकाळ दडपण झुगारण्यात अपयशी ठरत असलेली साक्षी अखेरच्या क्षणी बचावात्मक पवित्रा घेते. त्यामुळे तिला पराभवाला सामोरे जावे लागते. दिव्या काकरनने या सत्रात दोन सुवर्ण आणि दोन कांस्यपदके जिंकली. पूजा ढांडाकडून पदक जिंकण्याची अपेक्षा बाळगता येईल. सरिताच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असेल. फ्री स्टाईल प्रकारात दीपक पुनिया निकाल फिरविण्यात पटाईत मानला जातो. या स्पर्धेत तिन्ही शैलींच्या कुस्तीतून सहा गटांत सहा ऑलिम्पिक स्थानांचा कोटा असेल.विश्व चॅम्पियनशिपसाठी भारतीय कुस्ती संघपुरुष फ्री स्टाईल : रविकुमार (५७ किलो.), राहुल आवारे (६१ किलो.), बजरंग पुनिया (६५ किलो.), करण (७० किलो.), सुशीलकुमार (७४ किलो.), जितेंदर (७९ किलो.), दीपक पुनिया (८६ किलो.), परवीन (९२ किलो.), मौसम खत्री (९७ किलो.) आणि सुमित मलिक (१२५ किलो).पुरुष ग्रीको रोमन : मंजीत (५५ किलो.), मनीष (६० किलो.), सागर (६३ किलो.), मनीष (६७ किलो.), योगेश (७२ किलो.), गुरप्रीतसिंग (७७ किलो.), हरप्रीतसिंग (८२ किलो.), सुनीलकुमार (८७ किलो.), रवी (९७ किलो.) आणि नवीन (१३० किलो).महिला फ्रीस्टाईल : सीमा (५० किलो.), विनेश फोगट (५३ किलो.), ललिता (५५ किलो.), सरिता (५७ किलो.), पूजा ढांडा (५९ किलो.), साक्षी मलिक (६२ किलो.), नवज्योत कौर (६५ किलो.), दिव्या काकरान (६८ किलो.), कोमल भगवान गोळे (७२ किलो.) आणि किरण (७६ किलो).