पॅरिस : आॅलिम्पिक कांस्य विजेती साक्षी मलिक विश्व कुस्ती स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभूत होऊन बाहेर पडली. विनेश फोगाटला देखील उपउपांत्यपूर्व फेरीचा अडथळा दूर करण्यात अपयश येताच, या स्पर्धेत भारतीय खेळाडूंची खराब कामगिरी गुरुवारीदेखील कायम राहिली.पहिल्या तीन दिवसांच्या खराब कामगिरीनंतर सर्वांच्या नजरा होत्या त्या साक्षी आणि विनेश यांच्या कामगिरीवरच. पण दोघीही अपेक्षेनुरूप खेळ करण्यात अपयशी ठरल्या. साक्षीला ६० किलो गटात जर्मनीची लुईसा नीमेस्च हिने लोळविले. दोनवेळेची ज्युनियर विश्व चॅम्पियन अमेरिकेची व्हिक्टोरिया अॅन्थोनी हिने ४८ किलो गटात विनेशला चितपट केले. रिओ आॅलिम्पिकमधीलअपयशाची भरपाई करण्यासाठी आलेल्या विनेशसाठी हा धक्कादायक पराभव ठरला. याआधी विनेशने पात्रता फेरीत युक्रेनची ओकसाना लिवाच हिला नमविले होते. भारताच्या अन्य दोन मल्ल शीतल तोमर (५३ किलो) आणि नवज्योत कौर (६९ किलो) यांनादेखील पराभवाचे तोंड पाहावे लागले. नवज्योतला मंगोलियाची ओचिरबात नसानबुर्मा हिच्याकडून ५-१० अशा गुणफरकाने पराभव पत्करावा लागला. नवखी मल्ल शीतलने विजयी सुरुवात केली. तिने आॅस्ट्रेलियाची जेसिका मॅकबेन हिच्यावर १०-० ने मात केली. पण कामगिरीत सातत्याअभावी पुढच्या फेरीत रोमानियाची इस्तारा डोब्रे हिच्याकडून तिचा २-४ ने पराभव झाला.रिओ आॅलिम्पिकचे कांस्य विजेती पहिली महिला मल्ल साक्षीने घोर निराशा केली. आपल्यापेक्षा कमी रँकिंग असलेल्या खेळाडूला आव्हान देऊ शकली नाही. साक्षीने ६० किलो गटात आशियाई चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले होते. विश्व स्पर्धेत आता भारताच्या आशा पुरुष फ्री स्टाईल मल्लांवर असेल. त्यात आशियाई चॅम्पियन बजरंग पुनिया (६५ किलो) आणि आॅलिम्पियन संदीप तोमर (५७ किलो) हे पदकाचे दावेदार मानले जातात.(वृत्तसंस्था)
विश्व कुस्ती स्पर्धा : साक्षी मलिक, विनेश फोगाट यांनी केले निराश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 3:19 AM